उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा बांधवांचा जोरदार शक्तिप्रदर्शनासह जिल्हा मेळावा व जिल्हा पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम "स्वराज्य शिक्षक संघ" या अराजकीय संघटनेच्या माध्यमातून पार पडला.
दि. ८ सप्टेंबर रोजी शासकिय विश्रामगृह, उस्मानाबाद या ठिकाणी ' स्वराज्य शिक्षक संघाचे' प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो बांधवांच्या उपस्थितीत जिल्हा मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने व मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे हे होते तर सोलापूरचे सुभाष शेडबाळ, अजय पाटील, दशरथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने दरमहा एक तारखेला वेतन व्हावे, डीसीपीएस बाबतीत शासनाने योग्य धोरण ठरवावे, अधीक्षकांचे घरभाडे बंद करू नये, उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांचा सेवार्थ प्रणालीत समावेश करावा, उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता मिळावे इत्यादी मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडून आली.
यावेळी स्वराज्य शिक्षक संघाची जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी कंटेकुरे के. के., जिल्हा सचिव पदी कुंभार सतीश, जिल्हा उपाध्यक्षपदी जयसिंग जाधव, जिल्हा समन्वयक पदी आवटे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पदी औदुंबर जगताप, उमरगा तालुका अध्यक्ष पदी संतोष केंद्रे, भूम तालुका अध्यक्ष पदी विकास शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेश अध्यक्ष फत्तेसिंह पवार यांनी " आश्रम शाळा बांधव हा माझा श्वास आहे, व त्यांच्यासाठी अहोरात्र झटण्याची माझी तयारी आहे" असे प्रतिपादन केले तर नितीन शेरखाने जि प सदस्य व दादा कांबळे मनसे जिल्हा सचिव यांनी आश्रम शाळा बांधवांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे उभारू असे आश्वासन दिले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन हे राज्य संघटक बबनराव वाघमारे, राज्य कार्यकारिणी सदस्य भालचंद्र जाधव यांनी केले. तसेच चंद्रकांत चामे, लक्ष्मण सुपणार, पुरुषोत्तम माने, खगोले सर, प्रदीप शिंदे इत्यादी बांधवानी विशेष परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन इंगळे यांनी तर प्रास्ताविक बबनराव वाघमारे यांनी व आभार प्रदर्शन के के कंटेकुरे यांनी मानले.