काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार 17 सप्टेंबर मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोमवारी सकाळी सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व काटीचे सुपुत्र कै. हुतात्मा गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी सरपंच आदेश कोळी, जितेंद्र गुंड, दत्ता सोनवणे, अविनाश वाडकर, आबा रोडे, कृषी सहायक मनोज माळी, राजेंद्र भंडारी, हारून शेख, ज्ञानेश्वर गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. म्हणून आजचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाने हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकावण्यास बंदी घातल्याने एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला.
![]() |
| हुतात्मा गणपतराव देशमुख |
देशप्रेमाने पछाडलेल्या काटीचे गणपतराव देशमुखांनी या लढ्यात हिरिरीने भाग भाग घेऊन सोलापूर जिल्हय़ातील त्यांनी देगाव गाठले. त्या गावी पाटलाच्या वाडयात स्वातंत्र्यदिन साजरा केला. याच काळात काटी परीसरात दुष्काळ पडला होता. स्वतःचे धान्याचे गोदाम खुले करून गरीबाना धान्य पुरवले. 1948 ला निजामाने अध्यादेश काढून सर्वाची हत्यारे पोलीस स्टेशनला जमा करून घेतली. त्यावेळी फक्त रजाकाराकडे हत्यारे होती. यामुळे ग्रामरक्षक दलाच्या बैठकीत ठराव घेऊन हिंदूनाही हत्यारे बाळगण्यासाठीचा ठराव मांडण्यात आला. त्यामुळे रजाकार गणपतराव देशमुख यांचेवर चिडून होते. परंतु त्याकाळात देशप्रेमी मुस्लिमांनी धोका ओळखून त्यांना गाव सोडण्यास सांगितले. परंतु गावकर्यांना सोडून जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. अशा कडव्या स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिकाचा रजाकारानी घराच्या अंगणात झोपलेल्या अवस्थेत 5 मे 1948 ला त्यांची हत्या केली.
यावेळी ग्रामस्थामधून हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यासाठी स्थानिक पदाधिकार्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश कोळी यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके बॅ. ए. आर. अंतुलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उभारली गेली. याच धर्तीवर काटीचे सुपुत्र हुतात्मा कै. गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यासाठी शाशन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

