गेल्या दोन टर्म पासून एस सी संवर्गासाठी राखीव असलेल्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात हळूहळू वातावरण तापू लागले आहे. इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असून श्रेष्ठी कडे तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने शिवसेना,भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी या सर्वच राजकीय पक्षांनी तालुक्यात शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.
शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक असून आपल्यालाच उमेदवारी मिळणार या अपेक्षेने विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अगोदर पासूनच तयारी सुरू केली आहे. आमदार चौगुले यांनी उमरगा-लोहारा मतदारसंघात विविध विकास कामांचे लोकार्पण करत नवीन विकास कामांना निधी मिळवत उद्घाटनाचा धडाका उडवून देत कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली आहे.
त्याचबरोबर काँग्रेस कडूनही ही या मतदारसंघात मेळावे घेत गावपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मतदारांचा पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पेट्रोल,डिझेल भाववाढ महागाई आदी मुद्यावरून राळ उठवत कुठल्याही परिस्थितीत राज्यात सत्ता अनायचीच याचा चंग बांधून नेत्यांसह कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भाजप कडून मात्र विधानसभेची तयारी थंड दिसत असून लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कडून शेतकऱ्यांच्या प्रश्नंवरून आक्रमक होत मोर्चेबांधणी होताना दिसून येत आहे.सेनेकडून विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.त्यामुळे विद्यमान खासदार प्रा रविंद्र गायकवाड यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे.गेल्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत निवडून आलेल्या खासदारांना या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस या दोनच पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत असल्याने या दोन पक्षात तुल्यबळ लढती पहायला मिळतात.अलीकडच्या काळात सत्तेसाठी कांहीपन अशी भूमिका सर्वच पक्षातून घेण्यात येत आहे.काँग्रेस पक्षा कडून दोन चार नावे चर्चेत असली तरी मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतुन जातीयवादाचा मुद्दा कळीचा ठरला आहे.सध्या तालुक्यात काँग्रेस पक्षा कडून उमेदवारी मिळण्यावरून दोन चार नावांची चर्चा होत असली तरी आ बसवराज पाटील ज्या नावाला पसंती देतील त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे. या वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणाला उमेदवारी मिळते यावर विद्यमान आमदारांची हैट्रिक अवलंबून आहे.
