नवी दिल्ली :
देशातील नेत्यांच्या संपत्तीचे आकडे वाचताना ‘आकडी’ येण्याची वेळ येते. सर्वसामान्य माणूस ते नेता हा प्रवास करताना त्यांची संपत्ती कधी गडगंज रुप धारण करते हे लक्षात येत नाही. नुकत्याच एका अहवालातून समोर आलेल्या महितीत भारतातील आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २४.५९ लाख रुपये इतके असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटकातील आमदार सर्वात श्रीमंत असून तेथिल २०३ आमदारांचे सरासरी उत्पन्न १ कोटी ११ लाख इतके आहे. प्रदेशानुसार बघायचे झाले तर पुर्वेकडील राज्यांमध्ये ६१४ आमदारांचे उत्पन्न सर्वात कमी आहे. त्यांचे सरासरी उत्पन्न केवळ ८.५ लाख इतके आहे. याऊलट दक्षिणेकडील राज्यांत ७११ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५१.९९ लाख इतके आहे. छत्तिसगडमधील ६३ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५.४ लाख रुपये इतके आहे.
एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्ल्यू) ने देशभरातील आमदारांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करुन एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून एक धक्कादायक माहितीही मिळाली आहे. देशातील कमी शिकलेल्या आमदारांचे सरासरी उत्पन्न जास्त असल्याचे समोर आले आहे. आठवी शिकलेल्या नेत्यांचे वार्षिक उत्पन्न ९० लाख रुपये इतके आहे.
कमी शिकलेल्या आमदारांचे उत्पन्न जास्त
जास्त शिकलेल्या आमदारांच्या तुलनेत कमी शिकलेल्या आमदारांचे उत्पन्न जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशातील ४ हजार ८६ आमदारांपैकी ३ हजार १४५ आमदरांनी शपथपत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार ५ वी ते १२ पर्यंत शिकलेल्या आमदारांची संख्या ३३ टक्के आहे. या आमदारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ३१ लाख रुपये आहे. देशात पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्या ६३ टक्के आमदारांचे वार्षिक उत्पन्न २० लाख ८७ हजार आहे. तर काहीच न शिकलेल्या आमदारांची वार्षिक कमाई ९ लाख ३० हजार आहे.
शेती करणाऱ्या आमदरांची कमाई मोठी
शेती आणि व्यवसाय करणाऱ्या आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५७ लाख ८१ हजार इतके आहे. बांधकाम व्यवसाय, कला क्षेत्रात काम करणाऱ्या आमदारांचे उत्पन्न अनुक्रमे ३९ लाख आणि २८ लाख इतके आहे. सर्वात श्रीमंत आमदार एन नागराजु यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न १५७ कोटी इतके सांगितले आहे. ते बेंगळुरु ग्रामीण मतदार संघातील आमदार आहेत. तर सर्वात कमी कमाई आमदार बी. यामिनी बाला यांची आहे. त्यांची कमाई १ हजार ३०१ इतकी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तरुणांपेक्षा जेष्ठ आमदारांची कमाई चौपट
२५ ते ५० या वयातील आमदारांची संख्या १ हजार ४०२ आहे. त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १८ लाख २५ हजार आहे. तर ५१ ते ८० वयोगटातील १ हजार ७२७ आमदारांचे उत्पन्न २९ लाख ३२ हजार इतके आहे. यातही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे ८० पेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ८७ लाख ७१ हजार इतके आहे.
एडीआरचे संस्थापक सदस्य जगदीप छोकर यांनी सांगितले की, उच्च शिक्षण म्हणजे अधिक कमाई याची खात्री नाही. ज्या आमदारांचे उत्पन्न जास्त आहे त्यांनी आपला व्यवसाय शेती असल्याचे सांगितले आहे. या पाठिमागेही खास कारण आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही तसेच त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागत नाही असेही छोकर यांनी सांगितले.
साभार - पुढारी ऑनलाईन
