समाजकार्य करताना सामान्य लोकांसाठी वाहून घेतलेले महेंद्र धुरगुडे हे गोरगरीबांसाठी एवढा वेळ कसा देवू शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कौटुंबिक पार्श्वभूमी व कुटूंबातील सर्व सदस्यांचा महेंद्र धुरगुडे यांना मिळालेला पाठिंबा हेच त्यांच्या समाजसेवेच्या कामास प्रोत्साहित करत असल्याचे आढळून आले.
अतिशय सामान्य शेतकरी कुटूंबातील, स्वातंत्र सैनानी कै. भानुदास धुरगुडे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे सांभाळत महेंद्र धुरगुडे यांचे बंधू राजकुमार धुरगुडे यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी नौकरी करत असताना अल्पावधीतच शेतक-यांच्या हितासाठी व ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी सन ॲण्ड ओशन कंपनीची स्थापना सन 1998 साली केली. या कंपनीच्या माध्यमातून अडीचशे पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध झाला आणि महत्त्वाचे म्हणजे शेतक-यांच्या हितासाठी कंपनी सदैव तत्पर आहे. देशातील अनेक राज्यामध्ये या कंपनीचे उत्पादन वितरित केले जाते.
पुण्यासारख्या महानगरात मराठवाडयातील सर्वाधिक मागास असलेल्या जिल्हयातून आपला उदयोग समूह उभा करुन मराठवाडयातील लौकिक मिळवलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा मराठवाडा समन्वयक समितीच्या माध्यमातून सत्कार व सामाजिक कार्य केले जात आहे. त्याचाच भाग म्हणजे पुण्यात मार्गज्ञ वस्तीगृहाचा मराठवाडयातील सात हजारांहून अधिक विदयार्थ्यांनी लाभ घेतला. तर मागील तीन वर्षापासून मुलींसाठीही मातोश्री विमलबाई भानुदास धुरगुडे वस्तीगृह सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी तीन हजारापेक्षा जास्त मुलींना फायदा झाला आहे. पुण्यासारख्या महागडया शहरात फक्त दहा रुपयामध्ये विदयार्थ्यांना भोजन पुरवण्याचे कार्य सुरु असून दररोज पाचशे विदयार्थी याचा लाभ घेत आहेत. यामुळे मराठवाडयातील लाखो विदयार्थ्यांसाठी धुरगुडे यांचे नाव मदतीला धावून येत आहे.
तुळजापुरात मागील 19 वर्षापासून मुला-मुलींचे मॅरेथान स्पर्धा, सर्व मैदानी खेळ, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. मराठवाडयातील सर्व जिल्हयातील शाळेच्या विदयार्थ्यांची स्पर्धा घेतली जाते. स्पर्धकांना मोफत टी-शर्ट, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून तीन लाख रुपयांच्या बक्षिसाचे वाटप करण्यात येते. तसेच विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्हयातील सहकार क्षेत्र बुडित निघत असल्याच्या चर्चेनंतरही धुरगुडे यांच्या सन ॲण्ड ओशन कंपनीने शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. ते आजतागायत कायम आहे. या सर्व माध्यमातून महेंद्र धुरगुडे यांना जनसेवा करण्याची ऊर्जा कुटूंबियांकडून सतत मिळत आहे.
कुटूंबियाकडून मिळालेल्या या ऊर्जेमुळेच दि. 17 सप्टेंबर रोजी पुणे येथे पार पडलेल्या मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवात समाजसेवक या विशेष सन्मानाने महेंद्र भानुदासराव धुरगुडे यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, शेतक-यांची आर्थिक परिस्थिती पाहता विदयुत मोटार, स्प्रिंक्लर सेट, ताडपत्री आदी साहित्य सवलतीच्या दरात धुरगुडे यांच्या कडुन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

