नळदुर्ग :
आलियाबाद ता. तुळजापूर येथे स्मशानभूमीच्या रस्ता अडवून ग्रामस्थांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करणा-याविरुध्द जिल्हाधिका-यानी कारवाई करण्याची मागणी आलियाबाद येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथील स्मशानभुमी गावाच्या जवळ दक्षिणेस गट नंबर 181 मध्ये वस्ती झाल्यापासून आहे. या स्मशानभुमीच्या जागेवर सन 2005-2006 साली पंचायत समितीच्या वतीने पत्र्याचे शेड मारण्यात आले होते. त्यानंतर 2015-2016 मध्ये पंचायत समिती, लोकसहभागातून तसेच शेतकऱ्यांच्या सहमतीने मुरुम टाकून पक्का रस्ता करण्यात आले व रस्त्याच्या कडेला मार्किंग स्टोन करण्यात आले आहे. संबंधित एकाने ग्रामस्थांच्या विरोधात पोलीस ठाण्यात व कोर्टात खोटे गुन्हे दाखल करुन सतत त्याच्या मतीमंद मुलीला मारुन तसेच स्वतः आत्महत्या करुन तुम्हाला एखाद्या गुन्हात अडकवण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर संबंधित इसम व त्याच्या भावाने मुलीचे डोके फोडून शेजाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे नमूद करुन भविष्यात सुध्दा असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. तरी संबधित इसमाविरोधात प्रतिबंधक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, उपसरपंच सुर्यकांत राठोड, ग्रामपंचायत सदस्य रेखा चव्हाण, विलास राठोड, धानाबाई राठोड, छमाबाई राठोड, रामचंद्र पवार,पांडुरंग चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.
