तुळजापूर : दास पाटील

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवार दिनांक १५ रोजी अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रारंभी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या व तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून प्राचार्य डॉ. शेखर जगदे व उपप्राचार्य रवी मुदकण्णा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विभाग प्रमुख प्रा.प्रदीप हंगरगेकर व बी. एस. सूर्यवंशी हे उपस्थित होते .कार्यक्रमास उपस्थित एम.ई.च्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. विभाग प्रमुख बी एस सूर्यवंशी, पी. टी. सुर्यवंशी, प्रा प्रदीप हंगरगेकर यांनी अभियंता दिनाबद्दल मनोगत व्यक्त करून उपस्थित एम. ई. च्या विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जगदे यांनी भारतरत्न विश्वेश्वरया यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगून, नवीन अभियंत्यांनी नवनवीन शोध करावेत, देशात ज्याची गरज मोठी आहे त्यासाठी त्यांनी संशोधन करावे व देशाच्या विकासात भर घालावी, असे प्रतिपादन केले. अभियंत्यांनी संशोधन करताना सांगोपांग विचार केला पाहिजे व त्यावर आधारित संशोधन केले पाहिजे तरच त्या संशोधनाचा खरा उपयोग अभियांत्रिकी क्षेत्राला होईल, असे सांगून उपस्थित प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा. संतोष एकदंते यांनी केले. आभार उपप्राचार्य रवी मुदकण्णा यांनी मानले. 

 
Top