तुळजापूर : दास पाटील / कुमार नाईकवाडी
तुळजापूर शहरात थकित विजबिलामुळे शहरातील पथदिवे बंद आहेत.शहरात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने शिवाजी महाराज पुतळा परिसर अंधारात बुडाला आहे. त्यामुळे शिवप्रेमी भोसले बंधूंनी शिवरायांच्या पुतळ्यास जनरेटरद्वारे विद्युत पुरवठा सुरु करून हा परिसर उजाळून टाकला आहे. यासाठी इंधनासाठी प्रतिदिन १००० रु. खर्च ते करत आहेत.
त्यांच्या या उपक्रमाचा गौरव करण्यासाठी शहरातील शिवप्रेमी आणि राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब यांच्या वतीने शनिवारी सकाळी त्यांचे वडील, सुप्रसिद्ध मंडप काँन्ट्रॅक्टर दत्ता भोसले यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे सचिव सचिन शिंदे यांच्या हस्ते भोसले यांना गौरविण्यात आले.
यावेळी नितीन सूर्यवंशी, संजय दरेकर, सोनू नाईकवाडी, स्वराज जाधव, सुदर्शन वाघमारे, बिपिन शिंदे यांच्यासह शिवप्रेमी युवक उपस्थित होते. यावेळी बोलताना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रमाणे छ्त्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही विद्युत रोषणाई करणार असल्याचे प्रतिपादन दत्ता भोसले यांनी केले.
