मुरूम :- उमरगा तालुक्यातील मुरुम येथील ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रे निमित्त मंदिर समितीच्या वतीने गेले महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शनिवारी (दि 8) सकाळी शहरातून श्री कपिलेश्वरांची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
गेल्या तीन वर्षांपासून श्रावण महिन्यात येथील श्री कपिलेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व यात्रेचे आयोजन करण्यात येते.शनिवार (दि 8) रोजी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून श्री कपिलेश्वरांच्या मूर्तीची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत डोक्यावर जलकुंभ घेऊन महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.या यात्रेत "अग्गी" (अग्नी) प्रवेश कार्यक्रमाला फार महत्त्व असून भाविक मोठ्या श्रद्धेने हा कार्यक्रम पार पाडतात.
त्याचबरोबर एका विशिष्ट प्रकारची वेशभूषा करून पारंपरिक नृत्य सादर करत हातात शस्त्रे घेऊन सहभागी झालेली "पुरंत" मंडळी या यात्रेचे मुख्य आकर्षण असतात.त्याच बरोबर तुळजापूर येथील संबळ वादक संघाने आपली वाद्य कला सादर करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले.सन 1964 पासून मोठ्या भक्ती भावाने ग्रामदैवत श्री कपिलेश्वरांची यात्रा पार पडत असून श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आजतागायत अखंडपणे यात्रेची परंपरा जपली जात असल्याचे येथील जेष्ठ मंडळी सांगतात.यात्रे निमित्त शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे विश्वस्त तसेच हनुमान गणेश मंडळ,गांधी गणेश मंडळ,महादेव गणेश मंडळ,सिद्धरामेश्वर ग्रुप,जय म्हलार मित्र मंडळ आदी संघटनेच्या युवकांनी विशेष परिश्रम घेतले.