नळदुर्ग :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येडोळा ता. तुळजापूर येथील हातभट्टी अड्डयावर पोलिसांनी शनिवार दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजता अचानक धाड मारुन तयार गावठी हातभट्टी दारु व सोळाशे लिटर गुळमिश्रित रसायन असे मिळून सुमारे 1 लाख रुपये पेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केले. याप्रकरणी दोन आरोपींविरुध्द नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण धोंडिबा राठोड, राजू धोंडिबा राठोड (दोघे रा. येडोळा तांडा, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील येडोळा तांडा या ठिकाणी किरण राठोड, राजू राठोड यांच्या घरी पोलिसांनी छापा मारला असता चार प्लॉस्टिकच्या बॅरेलमध्ये गुळमिश्रित दारु बनविण्याचे मिश्रण सह आठशे लिटर, किंमत 60 लिटर रुपये प्रमाणे 60 हजार रुपये, त्याचबरोबर पाच लोखंडी बॅरेलमध्ये प्रति दोनशे लिटर प्रमाणे आठशे लिटर गुळमिश्रित दारु बनवण्याचे मिश्रण असे मिळून एकूण 1 लाख 8 हजार 450 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपींनी चोरटया पध्दतीने विक्री करण्याच्या उद्देशाने वरील गावठी हातभट्टी दारु व रसायन बाळगले होते. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णाराव खोडेवाड, पोलीस नाईक एन.एस. बांगर, महिला पोलीस पी.ए. नलावडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या घटनेची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अण्णाराव पांडुरंग खोडेवाड यांनी दिली. पुढील तपास हवालदार एस.एन. सुरवसे हे करीत आहेत.
फोटो :- येडोळा ता. तुळजापूर येथे कारवाईप्रसंगी मुद्देमालासह पोलीस कर्मचारी दिसत आहेत.