नळदुर्ग :

समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चतु: सुत्रावर आधारित तथागत भगवान बुध्दांच्या मानवतावादी सिध्दांतावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळेच देशातील उपेक्षित बहुजनांना मानवी हक्क मिळाले असून जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत मानवी हक्काला धक्का पोहचवू शकत नाही, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी मुर्टा ता. तुळजापूर येथे केले.

बौध्द विहार समन्वय समिती उस्मानाबाद जिल्हा शाखेच्यावतीने मुर्टा ता. तुळजापूर येथे धम्म जागृती अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भैरवनाथ कानडे हे बोलत होते. याप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक कैलास गवळी, सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, आर.एस. गायकवाड, रिपाइंचे जिल्हा सल्लागार एस.के. गायकवाड आदींची भाषणे झाली.

प्रारंभी तथागत भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन बुध्दवंदना घेण्यात आली. यावेळी मनोज गवळी, श्रीरंग गवळी, विश्वास गवळी, सुमनबाई लाखे, सोजरबाई गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जयसिंग गवळी यांनी केले.

 
Top