तुळजापूर : कुमार नाईकवाडी
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदला तुळजापूर शहरासह तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील सर्व औषधी दुकाने १००% कडकडीत बंद होती.
विविध कंपन्यांद्वारे होत असलेल्या अॉनलाईन औषधी विक्रीस विरोध करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने शुक्रवार दि. २८ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली होती. देशव्यापी संघटनेच्या सूचनेप्रमाणे तुळजापूर शहरासह तालुक्यातील औषधी दुकानदारांनी आपली औषधी दुकाने बंद ठेवली होती. शहरासह तालुक्यात एकही औषधी दुकान उघडले नाही. अॉनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात पुकारलेल्या या बंदमध्ये सर्व दुकानदारांनी सहभाग नोंदवून आपली दुकाने १००% बंदच ठेवली.
मागील आठवड्यात देशपातळीवरील या बंदचे नियोजन करण्यात आले होते. नियमित ग्राहक रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी मागील तीन ते चार दिवसांपासून तशा सूचना दुकानदार ग्राहकांना देत होते.
तुळजापूर शहरात एकूण ५८ औषधी दुकाने आहेत. सर्वच दुकाने १००% बंद होती. नियमित औषधी खरेदी करणार्या ग्राहक रुग्णांना अगोदरच बंद बाबत सूचना दिल्या गेल्या होत्या. परंतू काही रुग्णांचे मात्र सर्वच औषधी दुकाने बंद असल्यामुळे हाल झाले.
तत्पूर्वी गुरुवारी २७ रोजी शहरातील औषधी दुकानदारांची बैठक होऊन हा बंद संपूर्ण यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी दि. २८ रोजी सकाळी ११ वा. बंदसंदर्भातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार, तुळजापूर यांना देण्यात आले. यावेळी, किरण हंगरगेकर, लक्ष्मण निकम, जीवन वाले, संतोष लोखंडे, सचिन कुंभार, रोहीत नाईकवाडी, महेश वट्टे, प्रशांत संकपाळ, विश्वजीत पवार, मोरे, पंकज वारुळे, आनंद पाटील, उमेश बनसोडे, मयूर शेटे, आकाश मिसाळ, पवन सोनवणे यांच्यासह शहरातील औषधी दुकानदार उपस्थित होते.
शासनाकडे ऑनलाईन औषधी विक्री बंद करण्याबाबत वेळोवेळी मागण्या करूनही शासन या बाबीकडे गंभीरतेने पाहत नाही. या ऑनलाईन औषधी विक्री करणाऱ्या विविध कंपन्यांवर सरकारचे कसलेही नियंत्रण नाही.
बंदी असलेली, तसेच अप्रमाणित औषधी ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून बेधडक विकली जात आहेत. ही विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला असून तुळजापूर शहर व तालुक्यात हा बंद १००% यशस्वी झाला असल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष किरण हंगरगेकर, तालुका अध्यक्ष लक्ष्मण निकम, शहराध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी दिली.
