मुंबई : राज्य शासनाच्या वतीने भरविण्यात येणारा बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा 29 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे होणार आहे. हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या हॉलमध्ये हा मेळावा भरणार असून याद्वारे नाशिक जिल्ह्यातील होतकरू युवक युवतींना नोकरीची संधी मिळणार आहे.
दहावी-बारावी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयआयटी, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट आदी विषयातील पदवीधारक या मेळाव्यात सहभाग नोंदवू शकतात. नाशिक, औरंगाबाद तसेच खान्देशातील अनेक नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून इच्छुक तरुण- तरुणींना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी 20 ते 27 सप्टेंबरदरम्यान इच्छुक उमेदवार www.balasahebthackerayrojgarmelava.com या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करू शकता. ऑफलाईन नोंदणीचा पर्याय देखील ठेवण्यात आला आहे.
उद्योग मंत्रालय तसेच सीआयआयच्यावतीने यापूर्वी पुणे जिल्ह्यातील सासवड तसेच नवी मुंबईतील वाशी येथे रोजगार मेळावे घेण्यात आले. त्यात अनेकांना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील मेळाव्याचा जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.
