बार्शी (गणेश गोडसे) :- 

मुंबई येथील दहिहंडी कार्यक्रमात बोलताना भाजपा आ.राम कदम यांनी महिलांच्या संदर्भात अपमानास्पद व शांतता भंग होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात पहिला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ. मंदाताई शिवाजीराव काळे रा.उपळाई रोड,श्रीकृष्ण कॉलनी, बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सौ. काळे यांनी याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्या सामाजिक महिलांचे काम करतात.दि.3 सप्टेंबर 2018 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर येथे दहीहांडीचा कार्यक्रम होता. त्यावेळी दहीहांडीच्या कार्यक्रमाला भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम हे हजर होते.या कार्यक्रम प्रसंगी भाषण करत असताना महिलांचा अपमान व्हावा या उद्देशाने कदम यांनी  प्रक्षोभक भाषण करुन महिलांची शातंता भंग होईल असे वक्तव्य केले होते. मला फक्त एक फोन करा, चुकीच असेल तरीही 100 टक्के मदत करणार असे वक्तव्य केले होते.

त्यानंतर शहरातील महिलांनी फिर्यादी यांची भेट घेऊन महिलांसंदर्भात करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला होता.सर्व महिलांनी एकत्रीत होऊन आ. कदम यांनी आक्षेपार्ह विधाने करुन आपला अपमान केला असल्यामुळे त्याबाबत आपण रितसर पोलीस ठाणेस तक्रार देण्याबाबत ठरले होते.त्यानुसार सौ.काळे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आ.राम कदम यांच्या वर प्रक्षोभक व महिलांची मानहाणी होईल  असे वक्तव्य करूण महिलांची बदनामी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी लिगल सेलचे जिल्हा अध्यक्ष अॅड विकास जाधव,जिल्हा अध्यक्षा मंदाताई काळे,अॅड.राजश्री डमरे,मंगल शेळवणे,करूणा हिंगमिरे,रिजवाना शेख आदी उपस्थित होते. 
 
Top