काटी : उमाजी गायकवाड

गणपती ही सर्व विद्यार्थ्यांची प्रिय देवता. या देवतेचा उत्सव प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी मातीचे गणपती तयार करणे ही कार्यशाळा उत्साहवर्धक वातावरणात पिंपळा खुर्दच्या शाळेत आयोजित करण्यात आली. बदलत्या काळानुसार उत्सवाचं आयोजन करणे ही समाजाची जबाबदारी असते या जबाबदारीचे भान ठेवून आपले योगदान चांगल्या समाजकार्यात असावे हा उद्देश ठेवून शाळेत हा उपक्रम घेण्यात आला.

शाळेतील उपक्रमशील शिक्षक विठ्ठल नरवडे यांनी मुलांना गणपती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले .यावेळी त्यांनी या कार्यशाळेचा उद्देश व गरज याबाबत मार्गदर्शन करताना पर्यावरणाचा स्नेह जपण्यासाठी प्रत्येकांनी पाण्यात विरघळणारे गणपती तयार करून त्याचे पूजन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी खारीचा वाटा प्रत्येकांनी उचलण्याची गरज आहे असे सांगितले . तसेच प्रत्येक उत्सव व उपक्रमातून निसर्गाला ही आपण काहीतरी देण्याची वृत्ती प्रत्येकांनी जपायला हवी .

चिखलापासून मुलांनी आकर्षक मूर्ती तयार केल्या. वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे या चिखलात झाडांच्या बियाही घालण्यात आल्या .त्यामुळे विसर्जनानंतर बीजप्रसार होऊन वृक्षारोपण या मोहिमेलाही हातभार लावला जाणार आहे .एक  सत्कार्य ही या माध्यमातून करण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला. शिवाय मुलांना घरी मूर्तीची प्रतिष्ठापना करून इतरांनाही अशा उपक्रमात सहभागी होण्याची विनंती करा असे मुलांना सांगण्यात आले.

यासाठी देविदास गायकवाड, विठ्ठल नरवडे, मनोज पाटील, पांडुरंग जावळे बाळू मुंडे, शिवाजी वेदपाठक, गुणवंत चव्हाण, प्रशांत वैदकर, माधव मोरे, अंजली निकते, रामलिंग दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top