स्थळ - कार्यकर्ता मेळावा 
वेळ -  टळून गेलेली.
पात्र -  भुकेजलेले कार्यकर्ते. (पप्प्या, किशा, दाद्या)

 निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे सगळीकडे कार्यकर्त्यांना मागणी वाढली आहे. साहेबांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आहे, वेळ सायंकाळी सहाची 

पप्या -  च्यामारी! खुर्च्या पुरतीलं नव्ह, म्हणजे कसं पावसाची  शक्यता आहे. माणसं कमी खुर्च्या जास्त दिसू नये म्हणजे झालं. 

दाद्या - काळजी नको करू आपण भाडोञी माणसं  मागवू की,  नाही तर जेवण आहे म्हटल्यावर येतातच की (हा हा हा)

किशा - आपण नाही का, सांगितलं आज रात्रीच्या जेवणाला घरी येणार नाही!  (सगळे हसतात)

 मेळाव्याची तयारी पूर्ण झाली सात वाजले तरी साहेब आलेच नाहीत.

दाद्या -  सात वाजले मेळावा  कधी सुरू होणार? सगळे सांगतात साहेब निघालेत येतील येवढ्यात. 

पप्या - अजून काही वेळात साहेब येणारच आहेत.

पंचपक्वान बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटते. इकडे स्टेजवर कार्यकर्त्यांना साहेब पाच मिनिटात येत आहेत असे सांगण्याचे काम दोन तासापासून सुरू आहे रात्रीचे आठ वाजले आहेत साहेब आजुन येतच आहेत बसलेल्यांमध्ये मात्र चर्चा सुरू आहे रस्त्यावर खड्डे पडले आहेत म्हणून साहेबांना यायला  उशीर होत आहे. तेवढ्यात पक्या म्हणतो साडे आठ वाजलेत कार्यकर्त्यांच्या  जेवणावळी उठवायचा का?

किश्या -  (भुकेजलेल्या चेहऱ्याने) माझ्या मनातलं बोललास!,  पण आयोजकांना कोण बोलणार?
 (सगळेच विचारायला जातात.) 

 दाद्या - (गल्लीतल्या सायबास) साहेब जेवण तयार आहे. वेळ होत आलाय. कार्यक्रमाच्या आधी जेवू घालाव का?

गल्लीतले साहेब -  परंतु लोक  जेवण करून रेंगाळतील, काहीजण जेवून घरी निघून जातील आणि आपली फजिती होईल.

(तिघंही मान हलवतात, आलोच एसे खूणेने सांगून निघुन जातात. एका हॉटेलात जाऊन) 

पप्या -  मायला अवघड झालं की  घरात जाऊन जेवता येईना आणि कार्यक्रमात जेवण मिळेना.
(तिघंही चहा बिस्किट खातात, आणि कार्यक्रमास जातात)


शेवटी राञी नऊ वाजता सायबाची स्वारी येते. उपस्थित सगाळ्यांच्या चेह-यावर पोटात ओरडणा-या कावळ्याची किंकाळी स्पष्ट जाणावत आहे. माञ सायबाच्या लांबलेल्या  भाषणापुढे कोणाचे काय चलत नाही. 

किश्या, दाद्या पप्याच शक्कल लढवतात. तिघेही पब्लिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसतात व सायबाच्या प्रत्येक वाक्याबरोबर टाळ्या पिटतात.  व्यासपिठावरील सर्वजन कावरे बावरे होतात. आणि शेवटी साहेब  भाषण आटोपतात. राञी आकरा वाजता.. दाद्या, किश्या, पप्याच्या कृपेने उपस्थित श्रोते जेवणासाठी धावाधाव करतात.

- घाटशिळचा वाटाडया
 
Top