तुळजापूर :- सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तुळजापूरकडे येताना सिंदफळ गावाच्या अलिकडील सर्व्हिस रोडने तुळजापूर शहरात येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य परिवहन बसेस, लातूरकडे जाणारी जड वाहने सिंदफळ गावानजीकच्या उड्डाणपुलावरून न जाता गावाजवळील सर्व्हिस रोडने जात आहेत. सिंदफळ गावानजीकची वस्ती आणि शाळेजवळून हा रस्ता जात आहे. अवजड वाहनांमुळे येथील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पूर्वी तुळजापूरकडे जाण्यासाठी बार्शी चौकातील उड्डाणपुलाच्या अलिकडून रस्ता काढण्यात आला होता.

मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा मार्ग बंद करून तो सिंदफळ गावाच्याही अलिकडून सुरु केला आहे.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग सोडून सिंगल रस्त्यावरून सहा ते सात किलोमिटर अलिकडून ही वाहने धावत आहेत.

यामुळे येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. सिंदफळ ग्रामस्थांच्या जिवाला संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी पूर्ववत बार्शी चौकाजवळील उड्डाणपुलाच्या अलिकडून रस्ता सुरु करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत परियोजना निदेशक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर यांच्याकडे केली आहे.

या निवेदनावर माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम, शहराध्यक्ष धर्मराज सावंत, वेदकुमार पेंदे, प्रमोद कदम, ज्योतीबा पवार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 
Top