काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे शुक्रवार दि.( 14 ) रोजी येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्याना हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे अभ्यासक तथा व्याख्याते संजय भोयटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक सुधाकर उपासे गुरुजी होते.
यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावर मार्गदर्शन करताना मराठवाडा मुक्ती संग्रामचे अभ्यासक तथा व्याख्याते श्री संजय भोयटे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम लढा हा विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगून पुर्वी मराठवाडा हा हैदराबाद संस्थानात होता. या हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. या निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता. या लढ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले होते. विशेष म्हणजे या लढयाचा श्रीगणेशा स्वामी रामानंद तीर्थ यांनी राष्ट्रीय शाळा हिप्परगा येथून केला होता . स्वामी रामानंद तीर्थानी आपल्या त्यागी व प्रसन्न वृत्तीने नव्या पिढीवर संस्कार केले. निजामाच्या जुलमी व अत्याचारा विरुद्ध आपल्या जीवाची तमा नं बाळगता हा लढा मराठवाडय़ाच्या गावागावात लढला गेला. स्वामी रामानंद तीर्थानी देशासाठी जगणारे व देशासाठी कार्य करत मरणारे सुशिक्षित तरूण कार्यकर्ते तयार केले. महाराष्ट्र परिषदेची स्थापना व उदिष्टये, आर्य समाजाची चळवळ वंदे मातरम सत्यागृह , सरहद्दीवरील स्वातंत्र्य सैनिकांचे आंदोलन व 1948 चा कॉग्रेसचा सत्यागृह या सर्व बाबीमुळे निजामाच्या 16 जिल्ह्यात म्हणजे सर्व हैद्राबाद संस्थान पेटून उठले. संस्थान प्रमुख मीर उस्मान अलेखान बहादर हा सातवा निजाम होता . निजामाने संस्थानात खाकसार व रझाकार या दोन निमलष्करी संघटना स्थापन केल्या. खाक सार संघटनेचे उद्दिष्टय हिंदू ना बाटविणे व मुसलमान करणे. तर रझाकार संघटनेचे उद्दिष्ट हिंदू ना पराकोटीचा त्रास देणे व छळ करणे. लातूरचा वकील कासीम रझवी हा संघटनेचा प्रमुख होता. तो अविवेकी, धर्मवेडा ,उतावीळ, उद्दाम माणूस होता.1946 ते 1948 या तीन वर्षाच्या काळात त्याने भल्याभल्याची मती गुंग केली होती. मुसलमानाना भडकावण्याचे काम आपल्या आवेशपूर्ण भाषणातून करायचा. एक दिवस लाल किल्ल्या वर असफजाही ध्वज फडकवणार अशा डरकाळ्या फोडायचा. रझाकाराचे अत्याचार वाढत गेले. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्यानंतर निजामाने खरे रूप दाखवायला सुरुवात केली. सर्व संस्थानिक भारतात सामिल झाले पण निजामाने आझाद हैद्राबाद एक सार्वभौम इस्लामी राष्ट्र आहे असे नेहरू व पटेलाना सांगितले. कांही काळ भारत सरकार देखील रझवीच्या दोन लाख रझाकारामुळे संभ्रमात होते. उस्मानाबादचा तत्कालीन कलेक्टर हैदरने चिलवडी गाव पेटवण्याचे आदेश दिले.ईटच्या गोदावरी टेके ला जिवंत जाळले. नंदगाव रझाकारानी जाळले. लोक भयानक थैमानामुळे असहाय्य , केविलवाणे बनले होते. माणसाचा व माणूसकीचा मुडदा पडला होता. या सर्व बाबी विचारात घेता रझवी व निजामाची संस्थान वाचवण्यासाठी किती क्रुरता केली हे स्पष्ट होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील हुतात्म्याची माहिती सांगताना काटी येथील हुतात्मे गणपतराव देशमुख यांनी या लढ्यातील तरुणांना शत्रूशी लढा देण्यासाठी त्यांना हत्यारे मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचे सांगून दुष्काळात गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्याची गोदामे खुली करुन या लढ्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले. तसेच या लढ्यातील गुंजोटी येथील वेदप्रकाश , नळदुर्ग येथील बाबुराव बोरगावकर व निलय्या स्वामी, ईटमधील किसन टेके व गोदावरी टेके, अचलेरचे शंकर जाधव , आपसिंग्याचे श्रीधर वर्तक अशा अनेक विरांना हौतात्म आल्याचे सांगून त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. शेवटी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यानी हा प्रश्न पोलीस कार्यवाहीने सोडवला.13 सप्टेंबर 1948 ला भारतीय फौजा संस्थानात घुसवल्या . त्याना फारसा प्रतिकार झाला नाही.17 सप्टेंबर 1948 ला निजाम शरण आला. हा लढा वैशिष्टयपूर्ण लढा ठरला. कारण समाजातील सर्वच थरातील लोकानी सहभाग घेतला. संस्थान प्रमुख मुसलमान व 85 टक्के जनता हिंदू .परंतु हा लढा हिंदू व मुस्लिम यांचा नव्हता कारण रझाकार संघटनेत बरेच हिंदू होते. त्यामुळे आजच्या पिढी ने वरील बाब लक्षात घेतली पाहिजे. वरील लढा हा अन्यायाविरूध्दचा होता. कोणताही लढा घ्या त्यात सत्याचाच विजय होतो . हे या लढयाने जगाला दाखवून दिले. आता आपण लोकशाहीत वावरत आहोत. आता ही आपणास लढा द्यायचा आहे. सध्याच्या काळात निजामरूपी व रझवीरूपी समस्या आहेत. अस्वच्छता , पर्यावरण संरक्षण, विज्ञानाची कास धरणे, पाणीटंचाई, दुष्काळ निवारणाचे उपाय या समस्या सोडवण्याचे व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील विस्मरणात चाललेल्या त्यागी पुरुषांचा इतिहास प्रत्येकाने स्मरणात ठेवण्याचे आवाहन त्यानी यावेळी केले.
या कार्यक्रमास मुअ. शिंदे सर, नुतन तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मकरंद डोंगरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नुतन युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मकरंद डोंगरे यांचा व्याख्याते संजय भोयटे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



