मुंबई : 

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून विधानसभा निवडणुका वर्षभरात होणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्येच मंत्रिमंडळ विस्तार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महामंडळाच्या नियुक्त्यांनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचालीही भाजपच्या गोटात सुरू झाल्या आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर काही नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, तर काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची चर्चा होत आहे. 

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी गणेश दर्शनासाठी मुंबईमध्ये आले होते. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजप निवडणुकीवर नजर ठेवून प्रादेशिक आणि जातीय समीकरणांना महत्त्व देईल, अशी अटकळ बांधली जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून देण्यात आलेला डच्चू आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे त्यांची खाती अन्य मंत्र्यांकडे देण्यात आली आहेत. विस्तारानंतर त्यातील काही खाती ही नव्या मंत्र्यांकडे सोपविली जातील. मात्र, एकनाथ खडसे यांचे मंत्रिमंडळातील पुनरागमन कठीण असल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळात घटक पक्षांपैकी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाकडून सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद देण्यात आले. मात्र, आता सदाभाऊ हेच भाजपबरोबर आले असून, शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आल्याने राज्यात मंत्रिपद मिळणार नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले, तरी आठवले यांनी मात्र राज्यातही मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगतानाच त्यांनी पक्षातील जादा नेत्यांना संधी देण्यासाठी दर सहा महिन्याला आपला मंत्री बदलण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटे हे देखील मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.

 
Top