मुरूम :- आपण आपल्या लहान मुलांवर जे संस्कार करतो त्याला खूप महत्त्व आहे. मुले मोठी झाल्यानंतर त्यांना लहान वयात मिळालेल्या संस्काराने वाटचाल करीत असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर चांगले संस्कार टाकून सुसंस्कारित चांगली पिढी घडवावी, असे आवाहन गदग येथील पुराणिक पंडित विश्वनाथ शास्त्री यांनी मुरूम येथे केले.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कपिलेश्वर मंदिरात दि. 13 ऑगस्ट पासून पुराण कथा सुरू आहे. दररोज सांयकाळी येथील कपिलेश्वर मंदिरात 5 ते 7 या वेळेत पंडित विश्वनाथ शास्त्री हे कन्नड भाषेतून "कलबुर्गी शरणबसप्पा" पुराण सांगत आहेत.
शनिवार दि. 8 सप्टेंबर रोजी या पुरणाची सांगता करण्यात करण्यात येणार आहे. बसव पुराण कथे दरम्यान अनेक प्रसंग हुबेहूब साकारत गेले महिनाभर त्यांनी शरण बसप्पा यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले.सध्याच्या युगात अधर्मी वागण्यातून मानव जातीतील सुख,शांती नष्ट झाली असून आप आपसातील मने दुभंगली आहेत.मानव जातीच्या कल्याणासाठी प्रत्येकाने धर्माचे पालन करत आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या मुरूम भागात लिंगायत समाज बांधवांची संख्या मोठी आहे.लिंगायत समाजात श्रावण मासाला मोठे महत्त्व आहे.या महिन्यात अनेक ठिकाणी लिंगायत समाज बांधवांच्या वतीने विविध महापुरुषांच्या जीवनावर आधारित असलेल्या पुराण कथा आयोजित करण्यात येतात. युवा नेते बापुरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून येथील कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे तसेच कपिलेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
या यात्रेत अग्गी तुडवणे या कार्यक्रमाला मोठे महत्त्व असून भाविक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शनिवारी (दि 8) रोजी सकाळी शहरातून श्री कपिलेश्वर यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.