नाना बेरगुडे 
सेलू (दास पाटील) :- 

नाना बेरगुडे स्मृती समितीच्या वतीने यंदापासून देण्यात येणारा पुरस्कार गझलकार जयदीप विघ्ने यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून प्रतिवर्षी हा पुरस्कार मराठी गझलक्षेत्रात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या गझलकारास प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाना बेरगुडे स्मृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

मानवत येथील स्व. गझलकार, कवी नाना बेरगुडे यांची स्मृती चिरंतन जपण्यासाठी कवी, साहित्यिकांनी एकत्र येऊन या समितीची स्थापना केली आहे. 

जयदीप विघ्ने
यंदाचा पहिला नाना बेरगुडे गझल पुरस्कार २०१८ देऊळगाव राजा, जि. बुलडाणा येथील तरूण गझलकार जयदीप विघ्ने यांना जाहीर करत असल्याची घोषणा समितीने केली आहे. रु. पाच हजार रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. नियोजीत तारखेस समारंभपूर्वक हा पुरस्कार नानाचे आई, वडील यांच्या उपस्थितीत मान्यवर अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

जयदीप विघ्ने हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय आणि दर्जेदार कविता, गझल, स्फुटलेखन करीत आहेत. त्यांच्या या साहित्यसेवेची दखल घेऊन ही निवड करण्यात  आली आहे.  

नाना बेरगुडे हे मूळ मानवत येथील रहीवासी होते. मराठी काव्यक्षेत्रात, विशेषतः गझललेखनात त्यांचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांची स्मृती जतन करण्यासाठी यंदापासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 

रविवार, दि. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सेलू, जि. परभणी येथे हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. याप्रसंगी निमंत्रित गझलकारांच्या मुशायऱ्याचेही आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष संजय विटेकर आणि सचिव गोविंद नाईक यांनी दिली आहे. 
 
Top