लोहारा (इकबाल मुल्ला) :-
लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे वाटप व जागा खरेदी गैरप्रकरणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुळजापूर यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक उस्मानाबाद यांनी दिल्याने विद्यमान सभापती अच्युत साठे, उपसभापती प्रा. आनंदराव सुर्यवंशी व सचिव जयंत पाटील यांना चौकशी समितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बाजार समिती पदाधिकारी व प्रशासन वादाच्या भोव-यात सापडले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी दिलेल्या दि. 4/9/2018 जा.क्र. 3383 आदेशानुसार लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, उपसभापती प्रा. आनंदराव सुर्यवंशी व सचिव जयंत पाटील, व इतर यांनी संगनमताने कृषी उत्पन्न बाजार समितीला स्व मालकीची जागा नसल्याचे लेखी नमूद करून संचालक पणन संचनालाय पुणे यांची दिशाभूल करून फसवणूक करत नवीन जागा खरेदी करण्याकरिता मान्यता मिळवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार नवीन जमीन खरेदीत केला आहे. व गाळे वाटपात अनियमितता दाखवून शासन धोरणाचा अवलंब न करता गैरव्यवहार केल्याची तक्रार लोहारा येथील व्यापारी दिनकरराव शंकरराव जावळे-पाटील व गाळे धारक विनोद दिनकरराव जावळे पाटील, पंचय्या तिर्थय्या स्वामी, व पंचय्या शरणय्या स्वामी यांनी राज्याचे सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख व पणन संचालक यांच्याकडे तक्रार केलेली होती.
या तक्रारीची दखल घेत सहकार मंत्री ना.सुभाष देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी चौकशी समिती गठीत केली असून सहाय्यक निबंधक तुळजापूर श्रेणी - 1 यांना स्वतः सदर प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायसह प्रथम प्राधान्याने तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या चौकशी अहवालाकडे बाजार समितीच्या सर्व सभासद,शेतकरी,व्यापारी,आडत धारकांचे लक्ष लागले असून या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी होऊन बाजार समितीचा बोऱ्या वाजवणाऱ्याची व गाळे धारकांची फसवणूक करणाऱ्यांची निःपक्षपाती पणे चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुका वाशीयांतून होत आहे.यामुळे बाजार समितीचा गैरप्रकार उघडकीस येणार आहे.