नळदुर्ग: 

तुळजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव नळदुर्गचा श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. शुक्रवार दि. 21 सप्टेंबर रोजी कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी साखर आयुक्त पुणे येथे निविदा उघडण्यात येणार होत्या. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय होणार होता. मात्र या निविदेतील अटीबाबत दृष्टी शुगर ॲन्ड डिस्टीलरीजने घेतलेल्या आक्षपामुळे सहकारमंत्र्यांनी निविदा उघडण्यास स्थगिती दिल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगारांच्या उत्सुकतेवर पाणी फिरले आहे. 

श्री तुळजाभवानी साखर कारखाना सन 2012 पासून बंद आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहुन आमदार मधुकरराव चव्हाण व संचालक मंडळानी प्रयत्न करुन हा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर त्यास यश आले होते.  राज्य शासनासह साखर संघाने हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास परवानगी दिल्याने साखर कारखाना व्यवस्थापनाने त्याची जाहीर निविदा प्रसिध्दीकरण केले. याची दखल घेत सात निविदा अर्जाची विक्री झाली. त्यापैकी चौघा इच्छुकांनी निविदा अर्ज भरले. 

दरम्यानच्या काळात दृष्टी शुगर ॲन्ड डिस्टिलरीज यांनी निविदेमधील अट क्रं. 55 (1), (6) बाबत (अट कारखान्याच्या देणीबाबत व्यक्ती 1 भागीदार, संस्था, कंपनी, सहकारी संस्था किंवा कोणतेही व्यावसायिकावर देणीबाबत व्यावसायिकावर देणीबाबत मुकदमा चालू आहे. त्यांनी निविदेत भाग घेवू नये.) सहकार मंत्र्याकडे 15 सप्टेंबर 2018 रोजी तक्रार दाखल केली होती. 

दरम्यान, शुक्रवार दि. 21 सप्टेंबर रोजी पुणे साखर आयुक्तांच्या दालनात सदरील निविदा उघडण्यात येणार होती. यावेळी दृष्टी शुगरच्या तक्रारीची दखल घेत या अनुषंगाने शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. तोपर्यंत निविदा उघडण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी बोलताना सांगितले. यावेळी साखर आयुक्त पुणे, प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड, संचालक (प्रशासन) साखर आयुक्तालय पुणे व अवसायक श्री तुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग हे उपस्थित होते.
 
Top