नळदुर्ग :

ऐतिहासिक, पौराणिक व आधुनिकतेची विरळ सांगड असलेल्या व पर्यटकांना भुरळ घालणा-या नळदुर्ग येथील 126 एकर क्षेत्रावर वसलेला भुईकोट किल्ला सध्या बागबगीचा, विविध देशी विदेशी फुलझाडे मिळून एक लाख वृक्ष लागवडीमुळे किल्ला परिसर फुलून गेला आहे. युनिट कंपीनीने सुशोभिकरण व विकासात्‍मक बदल घडवून आणल्याने नळदुर्गचा किल्ल्याचे रुपडे बदलून गेले आहे. 

युनिटी कंपनीच्‍या माध्‍यमातून नळदुर्ग किल्‍ल्‍यात येणा-या पर्यटकांसाठी सुसज्‍ज वाहन पार्किंगची सोय करण्यात आली असून संगोपनार्थ हा किल्‍ला  घेतल्‍याने आज आश्‍चर्यकारक हा किल्ला पर्यटनाच्या क्षेत्रात नावारुपाला आला आहे. राज्यभरातुन शालेय, महाविदयालयीन विदयार्थ्यांच्या सहली मोठया संख्येनी याठिकाणी येत आहेत. तर पर्यटकांसाठी हा किल्ला आकर्षक पिकनिक पॉईंट म्हणून लक्ष वेधत आहे. 


भुईकोट किल्ल्यात जागोजागी डागडुजी करण्यात आली असून प्राचीन वास्तूस जोडणारे सर्व रस्‍ते सुसज्ज केले आहे. सर्वत्र विविध फुलझाडे लावण्यात आले. पर्यटकांसाठी जागोजागी स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, ठिकठिकाणी आसन व्यवस्था, कचराकुंडीची सुविधा उपलब्ध आहे. देशी-विदेशी आकर्षक विविध प्रकारची फुलझाडे व वृक्ष लागवडीमुळे आणि जागोजागी बगीचामुळे किल्ला परिसर बहरला आहे. 



किल्ल्यातील अंबरखाना, मुन्सिफ कोर्ट, बारादरी, रंगमहाल, उपली बुरुज, नवबुरुज, संग्राम बुरुज आदी ठिकाणी स्पायडर लिली, पांढरा चाफा, धुरंडा, रेड रीफ, रेड ड्रेसिना, मयुर पंखी, सोनचाफा, काळा सायकस, नारळ, पाम, मेनटालिया, टर्मिनल, एक्झोरा, कॅना, बटर गुलाब, चाफा, बांबू, झेब्रिना, रोहिओ, ट्रांगलो फायकस असे विविध देशी विदेशी फुलझाडासह गुलमोहर, लिंब, चिंच, सुरु असे मिळून एक लाख फुलझाडे व वृक्ष लागवड करण्यात आली आहेत. 

नर-मादी धबधबा हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. वर्षभरातील सुट्टीच्या व ठराविक दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा धबधबा चालू करण्याचा मानस आहे. नर-मादी धबधबा व पाणी महालच्या आतील बाजू स्वच्छता करुन डागडुजी करण्यात आली. सुरक्षा जाळी बसविण्यात आल्या. वाहून जाणारे पाणी थांबण्यासाठी 90 हजार क्युबिक मीटरचे दोन तलाव तयार करण्यात आले. त्यामध्ये 2 कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या पाण्यावरच नर-मादी धबधबा चालू करण्यात येणार आहे. भविष्यात संगीत कारंजे, किल्ल्याच्या बाह्य तटबंदीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे युनिटीचे मुख्य संचालक कफील मौलवी यांनी सांगितले. 

 
Top