नळदुर्ग :
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्यातील एका पोलिसानी होमगार्डसह मधधुंद अवस्थेत नळदुर्ग येथे गणेश मंडळापुढे राडा करुन गोळया मारीन म्हणून धिंगाणा घातल्याचा प्रकार गणरायाच्या आगमनादिवशी घडल्याने सर्वत्र जोरदार चर्चेचे पेव फुटले आहे. तर पोलिसांच्या ब्रीदला या घटनेने येथे हारताळ फासल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे.
उस्मानाबादचे पोलीस अधिक्षक आर राजा यांनी चार दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्यास भेट देवून शांतता कमिटीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांनी शांततेत उत्सव साजरा करावा, डॉल्बी-डिजे लावू नये, गोंधळ घालू नये, असे सांगितले होते. सामान्य लोकांना हे सांगितले. मात्र पोलिसांना हे सांगायचे राहिले होते का? अशा मदयधुंद पोलिसांची बदली नक्षलग्रस्त भागात करणार का, जिथे स्वत: पोलीस अधिक्षकांनी काम केले आहेत. याबाबत नागरिकांत चर्चा होत आहे.
गुरुवार दि. 13 सप्टेंबर रोजी रात्री शहरातील सर्वच गणेश मंडळाचे श्री गणरायाच्या मुर्तीची स्थापना झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास गणेश मंडळाच्या समोर असलेल्या मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अचानक एक पोलीस कर्मचारी व त्याच्यासोबत एक होमगार्ड येवून दारुच्या नशेत गणेश मंडळाच्या तरुणांना, कार्यकर्त्यांना तुम्हाला गोळया घालीन, म्हणून दमदाटी करण्यास सुरुवात केली. शिवाय कोणतेही कारण नसताना अशाप्रकारे धमकी देणा-या या पोलिसाला व होमगार्डला काही तरुणांनी समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना अरेरावीची भाषा करुन त्यांना गोळी मारण्याची धमकी दिली. दरम्यान हा प्रकार शहरातील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ, न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळ, ब्राम्हण गल्ली, त्याचबरोबर चावडी चौकात या दोघांनी केला आहे. यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी व महालिंग स्वामी यांनी या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाही अरेरावीची भाषा वापरुन या दारुच्या नशेत आपण काय बोलत आहोत याचे भान नसलेल्या मदमस्त झालेल्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच मध्यरात्री गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांना भेटून नगरसेवक विनायक अहंकारी व महालिंग स्वामी यांनी संपूर्ण हकीकत सांगितली. या घटनेमुळे शहरातील गणेश मंडळाचे तरुण कार्यकर्ते संतापले असून मदयधुंद पिलेल्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांची बदली करावी, अशी मागणी होत आहे. या पोलिसाचा असा अनेकवेळा प्रताप झाला आहे. यापूर्वी बसस्थानक परिसरातील दोन-तीन वेळा दारु पिवून या पोलिसाने नंगानाच केला होता. मात्र शहरवासियांनी याकडे डोळेझाक केले होते. परंतु काल गणेश मंडळाच्या गणेश मुर्तीसमोर या पोलीस कर्मचा-याने व होमगार्डने केलेला प्रताप पाहता आता त्यांची उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
