आपल्या पंखाखाली रानपाखरांना घेऊन, त्यांच्यात चैतन्य निर्माण करणारे महापुरुष म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय. महापुरुषांची चित्र मालिका म्हणजे इतिहास असतो. अशा इतिहासाचे स्मरण ठेवून एका वेगळ्या ध्येयाने तुळजापुरच्या पुण्य पावन नगरीत त्यांचा वसा जपणारे, अनेक निष्पाप, निरागस मुलांना चैतन्याचे बळ देऊन शिक्षणातून स्वावलंबनाचे धडे देत त्यांना आकार देत घडविणारे एक ध्येयवेडे दांपत्य म्हणजे श्री. विठ्ठल लक्ष्मण चव्हाण सर व सौ. उषा विठ्ठल चव्हाण मॅडम हे दांपत्य होय.
महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे श्री. वि. ल. चव्हाण सरांचे प्रेरणास्थान होते. उजाड माळरानाचे रुपांतर ज्ञान मंदिरात करणारे वि. ल. चव्हाण दांपत्य म्हणजे एक ध्यासपर्व आहे. श्री. वि. ल. चव्हाण सर अर्थात विठ्ठल चव्हाण सर यांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील देगाव या खेडे गावात ०२ जानेवारी, १९३६ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. सहा भाऊ, तीन बहिणी वडील सुतारकाम करीत हा गाडा हाकीत होते. कठीण परिस्थितीत शिक्षण घेत सरकारी शाळेत STC पर्यंत शिक्षण घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल, तुळजापूर येथे नोकरीस लागले. या हायस्कूलमधील ते पहिले शिक्षक होत.
श्री. वि. ल. चव्हाण सर हे मुळातच ध्येयवेडे शिक्षक होते. अनेक विषयांचा व्यासंग जपणारे ते बहुश्रुत शिक्षक होते. ते विद्यार्थीप्रिय होते. घडय़ाळ्याच्या काट्याप्रमाणे २४ तास सतत आपल्या शैक्षणिक कार्यात दंग राहणार व्यक्तीमत्व होत. गाडीभर शेण जमा करुन शाळेतील सर्व गरीब मुलांना घेऊन ते वर्ग खोल्या सारवून स्वच्छ ठेवण्यापासून खेड्यापाड्यातून छोटी मोठी स्वप्ने उराशी बाळगून शिक्षणासाठी आलेल्या मुलांची मने घडविण्याचे काम श्री. चव्हाण सर अगदी मनापासून करायचे. शिक्षणासारख्या माध्यमाच्या जोरावर राष्ट्र तारण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केल आहे. श्री. चव्हाण सर हे मुळातच रत्नपारखी असल्याने त्यांना दगडगोटे आणि हिरेमाणके यांच्यातला फरक तात्काळ कळत होता. आपल्या शाळेतून ते भेदक नजरेने व कोमल अंत:करणारे अनेक नररत्ने घडवीत होते. त्यांनी डाॅ. वर्जकुमार मेहता, कै. दिगंबर कावरे गुरुजी सारखी रत्ने घडविली. एक हाडाचा शिक्षक बनून विद्यार्थ्यांना गणित, संस्कृत, महत्त्वमापनासारखे विषय सोपा करुन शिकविणारे ते मातृह्रदयी शिक्षक होते. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हाच खरा मानवधर्म आहे हे शिकविणारे, शिक्षणाचे काम हाती घेऊन तडीस नेणारे, विद्यार्थ्यांचे शील घडविणारे, मनाची शक्ती वाढविणारे, बुध्दीचा विकास करणारे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन प्रोत्साहित करुन स्वावलंबी बनविणारे असे एक व्यक्तीमत्व म्हणजे श्री. वि. ल. चव्हाण सर होय.
सध्याच्या शिक्षण प्रवाहात शिकवणीचे पीक जोमात फोफावताना दिसते. तत्कालीन परिस्थितीत तुटपुंज्या पगारात निष्ठेने अध्यापन करीत गरीब, गरजू व होतकरू मुलांसाठी मोफत शिकवणी घ्यायचे. आज ८२ वर्षांचे आयुष्य घेऊन समाधानाने जगत असताना आजही स्मरणशक्ती व आरोग्य चांगले आहे. याचे श्रेय ते नियमित व्यायाम, योग्य आहार, समाधानीवृत्ती या गोष्टींना देतात. श्री. चव्हाण सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन देणे हा त्यांच्या सततचा ध्यास होता. अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्यात चैतन्य निर्माण करणे, हा त्यांचा श्वास आहे. आप्पा भगवान कदम या विद्यार्थ्यांची फीस भरणारे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी मोफत जेवणाची व्यवस्था करणारे. अरुण शिंदे या गरीब विद्यार्थ्यांला मदत करणारे व माझ्या नोकरीसाठी सर्वार्थाने तळमळीने झटणारे श्री. वि. ल. चव्हाण सर हे ज्ञान मंदिरातील पवित्र तीर्थस्थान वाटतात.
प्रामाणिक कष्टावर नितांत श्रध्दा ठेऊन शिक्षणाचा वसा जपत ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेऊन दगडगोट्यातून सुंदर शिल्पे घडविणाऱ्या या मानवतावादी श्री. वि. ल. चव्हाण सरांना अगदी तोलामोलाची साथ लाभली ती त्यांच्या धर्मपत्नी सौ. उषा चव्हाण मॅडम यांचे. त्याही शिक्षिका शिक्षणाचे पवित्र कार्य करत जगणारे हे थोर दांपत्य श्री. वि. ल. चव्हाण सरांच्या विचारांची पुजा बांधणाऱ्या सौ. चव्हाण मॅडम ह्या एम.ए., बी.एड्. होऊन ०१ सप्टेंबर, १९७८ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल, तुळजापूर येथेच शिक्षिका म्हणून सेवेचे व्रत स्वीकारून ते व्रतस्थपणे कार्य करीत राहिल्या. एन. सी. सी. चे प्रशिक्षण घेऊन सतत २५ वर्षे कॅप्टन म्हणून काम केले. अनेक मुलींना ते स्वावलंबन व स्वसामर्थ्याची शिकवण दिले. उत्तम गृहिणी, आदर्श शिक्षिका, वत्सल आई, खऱ्या अर्थाने सहचारिणी अशा अनेकविध भुमिका त्या समर्थपणे पार पाडणाऱ्या, प्रेमळ शिक्षिका आहेत. हायस्कूलमधील अनेक मुलींना स्वतःच्या जबाबदारीने एन. सी. सी. शिबिरासाठी घेऊन जाणारे, त्यांच्यात स्वत्व निर्माण करुन स्वावलंबी बनविणाऱ्या तसेच कधी कधी स्वतःच्या घरात खेड्यापाड्यातल्या मुलींना मायेचे घास भरविणाऱ्या प्रसंगी त्यांना न्हाऊ घालून मायेची उब देणार्या, विद्यार्थ्यांच्या मनात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या सौ. चव्हाण मॅडमचे कार्य हे मानवतेच्या खतपाणी घालून आपल्या पतीच्या सेवाभावी कार्याला खंबीरपणे साथ देणारे होते.
शिक्षणाबद्दल उदासिनता असलेल्या अनेक सामान्य कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणाऱ्या मुलींना शिस्तीचे धडे देऊन शिकविणाऱ्या टारगट मुलांवर वचक ठेवून त्यांना नजरेच्या धाकात ठेवून वात्सल्य भावनेने जपणाऱ्या त्या खऱ्या कर्तव्यदक्ष शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचे धडे देऊन स्वावलंबी बनविले. तर मॅडमने एन.सी.सी.च्या माध्यमातून मुलींना संरक्षणाचे व देशभक्तीचे धडे देऊन कणखर अनेक राणरागिणी बनवल्या आहेत.
प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे, असे म्हणणारे माझे परम श्रध्देय श्री. वि. ल. चव्हाण दांपत्य अनेक गोरगरीब पाखरांना ज्ञानप्रकाशाच्या प्रांगणात आणून स्वाभिमान व स्वावलंबनाची प्रेरणा दिली. जेव्हा माणसे व पर्वत भेटतात तेव्हा थोर कार्य होतात. सरांनी जे शिक्षणाचे रोप लावले. ते रोपटे आज वटवृक्षाच्या रूपाने आपणास पहावयास मिळते. हा वटवृक्ष म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल. त्यांच्या परीस स्पर्शाने अनेकांचे जीवन उजळले. त्यांच्या पिढ्या सुसंस्कृत झाल्या. विद्यार्थ्यांचा अखंड प्रेमाचा झरा म्हणजे चव्हाण सर व मॅडम होय. माझ्या कुटुंबाच्या अनेक खडतर प्रसंगात आमच्या पाठीशी आधारवड म्हणून उभे टाकले. आमच्या कुटुंबातील नाते हे गुरु शिष्यापुरतेच मर्यादित न राहता, ते त्याच्याही पलीकडे जाऊन आपलेपण जपणारे, जिव्हाळ्याचे बनले. पंढरीचा विठ्ठल हा लाखो वारकऱ्यांचे श्रध्दास्थान आहे. पण श्री. वि. ल. चव्हाण सर या व्यक्तीमत्वातील विठ्ठल मात्र माझ्या व माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचे श्रध्दास्थान आहे. तुळजापूरच्या मातीत ज्ञानदानाचा पवित्र वसा जपत गोरगरीब होतकरू मुलांच्या मनावर आपल्या आचार विचारातून संस्कार रुजविणाऱ्या ज्ञानाच्या प्रांतातील या विठ्ठल रखुमाई जोडी सार्थ ठरविणाऱ्या श्री. वि. ल. चव्हाण दांपत्याला दीर्घ आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करुन ही शब्दरूपी पुष्पांजली या थोर दांपत्याला समर्पित करुन माझ्या शब्दांना विराम देऊन हे विचारपुष्प संपविण्यापूर्वी कवीवर्य बा.भ. बोरकरांच्या काव्य पंक्तींना स्मरण करतो.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१ वी जयंती व डाॅ. बापूजी साळुंके यांचे जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने हा लेख त्यांना समर्पित करतो.
- कुमार नाईकवाडी, तुळजापूर
