जळकोट :
तुळजापूर तालुक्यातील बोरमन तांडा (जळकोट) येथे पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. गणेशोत्सवासाठी तो आजीकडे राहण्यासाठी आला होता. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
विकास बाबू राठोड (रा. कास्ती, ता. लोहारा) आपल्या मित्रांसमवेत गोपाळ धंजू राठोड यांच्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्यात पडल्यावर त्याचा अचानक बुडून मृत्यू झाला. विकास जळकोटच्या कुलस्वामिनी आश्रम शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. तो सणासाठी आजीकडे राहण्यासाठी आला होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात नळदुर्ग येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.