नळदुर्ग (सचिन गायकवाड) :- 

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा, होर्टी, मुर्टा, किलज येथील बैल पोळ्याच्या सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. वर्षातून एकदा येणारा पोळा सण हा प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण या वर्षी बळीराजाला भरपूर पाऊस पडेल व शेतकरी समाधानी होईल असे प्रत्येकाला वाटत होते. वरूण राजाने शेतकऱ्यांसह जनावरांना मोठ्या संकटात पाडले आहे. चिकुंद्रा येथे सर्व प्रथम प्रत्येक शेतकरी आपल्या सर्जा राजाला पिवळी माती (पिवळा रंग) लावून सामाजिक घोषवाक्य बैलाच्या अंगावरती लिहून एक सामाजिक संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. बैलाच्या शिंगाला वारनेस लावला जातो. त्यावरती रंगी बेरंगी बेगङ लावून सर्जा राजाचा साज सजविला जातो.

तसेच गावातील प्रत्येक शेतकरी आपआपल्या बैल, गाय, म्हैस, गावात आणले जातात. गावातील भैरवनाथ मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्ता मंदिर, महादेव मंदिर व मारूती मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा घालून मारूती मंदिराच्या समोर नारळ फोडून चांगभलं .....! च्या जयघोषाने गावातील परिसर दुमदुमून जातो. त्यानंतर बैल, गाय तसेच सोबत असणारी सर्व जनावरे घरी नेऊन मोठ्या थाटामाटात अंगात पुजा करून कुटुंबातील सर्वजण पाच प्रदक्षिणा घालून बैल, गाय यांना गोड नैवेद्य भरवला जातो अशा पध्दतीने मोठ्या उत्साहात बैल पोळा सण साजरा करण्यात आला.
 
Top