राखी विजयकांतदास वैष्णव 
अंबाजोगाई : दत्ता खोगरे

अंबाजोगाई शहरात डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान मांडले असून शासकीय आणि खाजगी रुग्णालये डेंग्यूच्या रुग्णांनी खचाखच भरली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवार दि. 18 सप्टेंबर रोजी दुपारी एका अभियंता तरुणीचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे या प्रश्नांचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

राखी विजयकांतदास वैष्णव (वय २५, रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. मागील काही दिवसापासून तिला कमी-अधिक प्रमाणात ताप येत होता. मात्र गत दोन दिवसात ती तापाने अधिकच फणफणली. तपासणीअंती तिला डेंग्यू झाल्याचे लक्षात आले असे नातेवाईकांनी सांगितले. मंगळवारी दुपारच्या सुमारास स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. राखी वैष्णवने नुकतेच अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. मनमिळाऊ स्वभावाच्या राखीच्या अकल्पित मृत्यूने वैष्णव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

दरम्यान, मागील काही महिन्यात अंबाजोगाई शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश्य आजाराची जोरदार साथ सुरु आहे. मागील आठवड्यातच अंजनपूर कोपरा येथील एका व्यक्तीचा या अजारामुळे मृत्यू झाला होता. शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, अद्यापही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत. नगर पालिकेकडून अधून मधून धुराची फवारणी करण्यात येत आहे, पण ती तोकडी पडत असून त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तसेच, फवारणीसाठी वापरण्यात येणारे औषध देखील निकृष्ट दर्जाचे असून थोड्याच वेळात डास पुन्हा हजर होत असल्याचेही नागरीकांनी सांगितले.
 
Top