उस्मानाबाद :
उस्मानाबाद जिल्हा वासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या बनलेल्या तुळजापूर रेल्वे प्रकल्पासंदर्भात संभाजीराजे महत्वाची भूमिका निभावत आहेत. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जे जे करता येईल ते ते सर्व प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. नुकतेच छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून आवश्यक तो पत्रव्यवहार करून त्यांना या प्रकल्पाचे महत्व समजावून सांगितले आहे. त्यांच्या स्वतःच्या गैरहजेरीत त्यांनी त्यांचे स्वीय सहायक योगेश केदार यांना अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत आणि कसलीही उणीव राहू नये म्हणून केंद्रातील सर्वात यशस्वी आणि वजनदार मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा यामध्ये लक्ष घालण्यास विनंती केली आहे.
संभाजीराजेंच्या या विनंती ला मान देत गडकरींनी मी सुद्धा लक्ष घालतो आणि मंजूर असलेल्या या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सकारात्मक भूमिका निभावतो असे आश्वासन दिले. येत्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पासाठी अंदाजित धनराशी मंजूर करून पुढील कामांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली. तुळजापूर प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या जातील असे परत एकदा आश्वासन गडकरींनी दिले , असे संभाजीराजेंच्या सचिवांनी सांगितले.
