मुरूम :

उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातील यशवंत नगर येथील लोकमान्य गणेश मंडळाकडून सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी आ. बसवराज पाटील यांच्या हस्ते गोरगरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

 सामाजिक बांधिलकी जोपासत गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील यशवंत नगर भागातील लोकमान्य गणेश मंडळाच्या श्रींची आरती सोमवार (दि 17) रोजी आ बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी नगराध्यक्षा अनिता अंबर,प्राचार्य सपाटे सर,माजी नगराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे,जेष्ठ नागरिक शंकरप्पा बरबडे,नगरसेवक शंभुलिंग पाटील,प्रमोदआबा कुलकर्णी,विरभद्र बरबडे,नंदकुमार कारंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्रींच्या पूजनानंतर आ पाटील यांच्या हस्ते येथील वसंत विद्यार्थी वसतीगृहातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वही,पेन आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच गरीब कुटुंबातील लहान मुलीच्या शिक्षण तसेच विवाहा पर्यंतच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारलेल्या गुंजोटी ता उमरगा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री अरविंद बदने यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर प्रा बारवकर,प्रा ए ए बिराजदार,प्रा हुलपले आदी पी एच डी प्राप्त शिक्षक तसेच विजयकुमार देशमाने,भोसले सर,श्रीमती पोतदार मॅडम,तुपेरे मॅडम आदी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचे चालक,पालिकेचे स्वच्छता कर्मचारी आदींचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा के के ब्याळे यांनी केले तर शुभम वैरागकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top