बार्शी (गणेश गोडसे) :-
राष्ट्रीय कृषी पत्रकार संघ (अनाज इंडिया) यांच्या वतीने दिला जाणारा कृषी गौरव पुरस्कार २०१८ हा अखिल भारतीय सीताफळ संघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे यांना गुजरात राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद व गुजरातचे विधानसभा सदस्य दीपसिंग राठोड यांच्या उपस्थितीत महात्मा मंदिर, गांधीनगर (गुजरात) येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करून बांधावरच्या सीताफळाला न्याय देण्याचे काम केले .सीताफळाच्या ४२ प्रकारच्या जातीचे संवर्धन करीत स्वतः संशोधनातून निर्माण केलेल्या एनएमके -१ (गोल्डन) या जातीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.कसपटे यांनी आयुष्यभर सिताफळाच्या बाबतीत केलेल्या तपश्चर्येचे फलित म्हणजे एनएमके -१ गोल्डन व मधुबन फार्म अॅण्ड नर्सरी येथे उभी केलेली भारतातील सर्वात मोठी सिताफळ नर्सरी होय. राष्ट्रीय कृषी पत्रकार संघाने देशातील कृषी क्षेत्रातील सर्वोच्च कृषी गौरव पुरस्कार दिल्याने कसपटे शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.