सांगली : राजेश पाटील
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई आश्रमशाळा लैंगिक अत्याचारप्रकरणी गुरुवार रोजी ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थांकडून नराधम अरविंद पवार याच्या आश्रमशाळेवर हल्लाबोल करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी काढून दहन करण्यात आले.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळपमधील मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर याचे तीव्र पडसाद कुरळपमध्ये उमटले. संतप्त ग्रामस्थांनी या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ अरविंद पवार याच्या आश्रमशाळेवर हल्लाबोल करत संस्थाचालक असणाऱ्या नराधम पवारच्या कार्यालयाची तोडफोड केली. आक्रमक ग्रामस्थांनी अरविंद पवार याच्या निषेधार्थ गावातून मोर्चा काढला. आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तिरडीवरुन फेरी काढत दहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. पीडित मुलींशी संवाद साधला. कुरळप पोलीस ठाण्यास भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी, कुणाचीही गय करु नका, जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे आदेश नांगरे-पाटील यांनी कुरळप पोलिसांना दिले आहेत.
गावाला कलंक लावणाऱ्या या घटनेचा कुरळप ग्रामस्थांनी जोरदार निषेध नोंदवत आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
