नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील एकमेव सहकारी तत्त्वारील असलेल्या नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत निविदा प्रक्रियेवरुन राजकारण्यात जुंपली आहे. त्यावरुनच आरोप प्रत्यारोपाची फैरी झडत असतानाच उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही या निविदा प्रक्रियेत जिल्हा बँकेला सहभागी करुन न घेतल्याने अखेर निविदा प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून स्थगिती मिळवली आहे. या घटनेवरुन शेतक-यांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याकडे उस्मानाबाद जिल्हा बँकेचे सुमारे 119 कोटी 50 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज असून जिल्हा बँकेची आर्थिक परीस्थिती कोलमडली असल्याने कर्जवसुलीसाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रिेयेसाठी संचालक मंडळाने ठराव घेवून शासनाकडे पाठविला होता. याबाबत निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत जिल्हा बँकेला कुठेही स्थान देण्यात आले नाही. दरम्यान, साखर आयुक्त व सहकारमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत निविदा प्रक्रियेतील त्रिसदस्यीय समितीमध्ये बँकेस सामावून घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतू बँकेचा समावेश न करता कारखान्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच जिल्हा बँकेने निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी केली असता यामध्ये बँकेच्या कर्जाची वसुली होण्याबाबत काही सुधारणा सुचविल्या होत्या. कारखान्यासह आसवानी प्रकल्पातून मिळणारे भाडे रक्कमेचा बँकेकडे परतफेडीचा कोणताही उल्लेख नव्हता. या सर्व कारणामुळे जिल्हा बँकेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन तुळजाभवानी कारखान्याच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती मिळवली आहे.
