सांगली : राजेश पाटील

अनैतिक संबंध लपविण्यासाठी प्रियकराच्या मदतीने सख्ख्या बहिणीनेच भावाचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथे घडला आहे.  रमेश बाळासो झांबरे (वय ३०)  असे मयताचे नाव आहे. मयत रमेशचा मृतदेह दहा दिवसापुर्वी डोंगरसोनी - वाघोली रस्त्यावर सापडला होता. याबाबत 7 सप्टेंबर रोजी तासगाव पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. 

या खुनप्रकरणी तासगाव पोलिसांनी रविवारी सुधाकर तानाजी झांबरे वय ३८ रा डोंगरसोनी आणि सारिका संपत पाटील वय ३२ रा वडगाव (ता. तासगाव) या प्रेमी युगुलास अटक केली. न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेने डोंगरसोनीसह तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार] सारिका हिचे  वडगाव येथील संपत पाटील याच्याशी विवाह झाला होता. डोंगरसोनी येथे वडील बाळासो झाम्बरे यांची द्राक्षबागा होती. या द्राक्षबागेत कामाच्या निमित्तानं  ती सारखी माहेरी जायची. सारखी माहेरी का जाते याची शंका पतीसही येत होती. मात्र संशयित आरोपी सारिका पाटील आणि सुधाकर झांबरे यांच्यात अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते. या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा गावात रंगत होती. गावातून याची कुणकुण सारिकाचा भाऊ रमेश झांबरेला लागल्याने याचा जाब त्याने बहिणीस विचारला.

या संबंधाच्या प्रश्नाने दोघांत चांगलीच वादावादी झाली होती. याबाबत रमेशने सारिकाला परत काही कानावर आले तर बघ अशी समजही दिली होती. घडलेला प्रकार सारिकाने प्रियकर सुधाकर यास सांगितला व आपल्या प्रेमसंबंधात याचा अडथळा येत असल्याचे सांगितले. भावाचा अडथळा होऊ नये व इतरांना याचा सुगावा लागू नये म्हणून सारिका आणि तिचा प्रियकर सुधाकरने रमेशच्या खुनाचा कट रचला. 

खुनाच्या दोन दिवस अगोदर सुधाकर झांबरे रमेशला घेऊन जेवणासाठी धाब्यावर गेला होता. रमेशला दारू पाजली व परत जाताना डोक्यात जड वस्तूचा घाव घातला. अचानक झालेला हल्ला व डोक्यावर जोरदार घाव बसल्याने रमेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मृतदेह डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावरच टाकून सुधाकर झांबरे याने पळ काढला होता. खुनानंतर दोन दिवसांनी (दि ७) रोजी रमेश झांबरे याचा मृतदेह सापडला होता. तासगाव पोलिसात अपघाती मृत्यू अशी नोंदही झाली होती. मात्र तपासादरम्यान तासगाव पोलिसांना मयत भावाच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलीसी खाक्या दाखवताच दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तासगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
Top