काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यात काटी, सावरगाव, सुरतगाव, तामलवाडी, सांगवी (काटी ) आदी परिसरात रविवारी दि. (20)रोजी परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने काढणीला आलेले सोयाबीन, काढून पडलेले सोयाबीन पिक, शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
परतीचा पावसाने रविवारी रात्री काटीसह परिसरातील गावांना झोडपून काढल्याने शेतात पाणी साचले तर अनेक शेतकऱ्याचा शेतातील कट्टे फुटून अतोनात नुकसान झाले. तामलवाडी गावातील घरात मुसळधार पावसामुळे 30 ते 40 घरात पाणी घुसल्याने घरात गुडघाभर पाणी घुसल्याने सत्तापा कोंडे, सुधाकर घोटकर, गजेंद्र व्यवहारे, संतोष घोटकर, बब्रुवान गवंडी, भुजंग करंडे, मोहद्दीन शेख, महादेव गुंड आदीच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर काटी येथील मनोहर नारायण इनामदार यांचे तीन खनाचे माळवद कोसळले. अनेकांच्या शेतातील काळी माती वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर निरंजन करंडे यांची म्हैस व ख्वाजा शेख यांची बैलगाडी वाहून गेली. हरिजन वस्तीतील काही घरांच्या खालून पाणी जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. अनेकांनी रात्र जागून काढली , अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणी घरात घुसल्याने नुकसानग्रस्तानी ग्रामपंचायत विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जनावरांनाचा चाराही काळवंडला. या परतीचा पावसामुळे तामलवाडी साठवण तलाव तुडुंब भरल्याने सुरतगाव नजिकच्या राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने तीन तास वाहतूक ठेवण्यात आली होती.
काटीसह परिसरात रविवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे दहिवडी साठवण तलाव 100 टक्के भरला असून काटीचा तलाव 50 टक्के भरला आहे. तर सांगवी (काटी) चा साठवण तलाव ओहरफ्लो झाल्याने सोमवारी गावाचा संपर्क तुटला होता. 1998- 99 नंतर झालेल्या हा सर्वात मोठा पाऊस असल्याचे वयोवृद्ध नागरिकांनी सांगितले. तामलवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप यांनी नुकसानीची पहाणी करुन घाबरून न जाण्याचे आवाहन केले तर तलाठी शिंदे व ग्रामसेवक लाटकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
रविवारी रात्रीपासून सुरू झालेला रात्रभर मुसळधार पाऊस भरसल्याने परीसरातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.शेतात जाणारी पांदीरस्त्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सुदैवाने या मुसळधार पावसामुळे कुठलीही जिवितहानी झाली नाही. पुर्ण पावसाळ्यामध्ये असा पाऊस कधी पाहिला नव्हता असे प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. सगळीकडे पाणीच पाणी अशी परीस्यिती ह्या परीसरात निर्माण झाल्याने शेतांना तळ्याचे स्वरुप आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने हाती आलेला शेतमाल काढण्याच्या तयारीला शेतकरी लागला असतानाच पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.