उस्मानाबाद, दि.22: 

उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाकरीता सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असुन निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

 याकरीता सर्व मतदार संघात मतमोजणीकरीता प्रशासनाने योग्य ते नियोजन केलेले आहे.

मतमोजणीकरीता 240-उमरगा (अ.जा.), 241-तुळजापूर, 242-उस्मानाबाद आणि 243-परंडा या विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 टेबल तसेच पोस्टल बॅलेटकरीता 02 टेबल तर ईटीपीबीएसकरीता 03 टेबल लावून मतमोजणी करण्यात येणार आहे. या मतमोजणीच्या 14 टेबलाकरीता 3 अधिकारी तर पोस्टल बॅलेट आणि ईटीपीबीएस टेबलाकरीता प्रत्येकी 2 अधिकाऱ्यांची नियूक्ती करण्यात आली आहे.


240-उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सभागृह पंचायत समिती, उमरगा येथे होणार आहे. तर 241-तुळजापूर मतदार संघाची श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर, 242-उस्मानाबाद मतदार संघाची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद आणि 243-परंडा मतदार संघची अनुसूचित जाती व जमाती मुलांचे वसतीगृह, गोलेगाव ता. भूम येथे होणार आहे. सदर मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8:00 वाजता सुरु होणार आहे.

जिल्ह्यातील चारही मतदार संघात गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00 वाजता स्ट्राँगरुम उघडण्यात येणार असून उमेदवार/उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी ओळखपत्रासह वेळेवर उपस्थित रहावेउमेदवार/उमेदवारांचे प्रतिनिधीना मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यंत मतमोजणी केंद्र सोडून बाहेर जाता येणार नाही. तसेच एकदा बाहेर गेल्यास त्यांचे ओळखपत्र जमा करण्यात येईल व त्यांना परत देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी त्यांचे नियुक्त केलेल्या चहानाश्ताजेवणाची व्यवस्था या कार्यालयाने नियुक्त केलेल्या अभिकर्त्यामार्फत ठरवून दिलेल्या दराप्रमाणे त्यांच्या स्तरावर करावी. तसेच कुणालाही मतमोणी केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करता येणार नाही. मजमोजणीची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीची सुरुवात करण्यात येईल. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या नंतरच व्हीव्हीपॅटची मतमोजणी होईलया प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्यामुळे उमेदवारांनी आपल्या प्रतिनिधींना अवगत करावे. फेरीनिहाय तसेच उमेदवार निहाय प्राप्त झालेल्या मतांची आकडेवारी काऊंटींग सेंटरच्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनवर दर्शविण्यात येणार आहे.


 तसेच राजकीय पक्षाच्या प्रतिनीधीनी मतमोजणीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल किंवा वाहनतळ (पार्किंग) व्यवस्थेची  माहिती घेवून पोलीसांना सहकार्य करावे.

या मतमोजणी प्रक्रियेचे निरिक्षण केंद्रीय सेवेतील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी करणार आहेत. सर्व मतदार संघात होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेवर वेबकास्टींगद्वारे सनियंत्रण ठेवण्यात येणार असून या प्रक्रियेचे चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिये दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सर्व मतदार संघात पुरेसा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. 

 मतमोजणीची प्रत्येक  फेरीनिहायची माहिती ही आयोगाच्या ‘सुविधा’ ॲपवर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक‍ अधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी दिली आहे. 


तसेच ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया कोणत्याही अनुचित घटनेशिवाय शांततेत पार पाडली. त्याप्रमाणेच मतमोजणी प्रक्रिया देखील शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक‍ अधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी केले आहे.

 
Top