काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथे बुधवार  दि. ( 6 ) रोजी  सायंकाळी तामलवाडी पोलीस  ठाण्याच्या  वतीने उपविभागीय  पोलीस अधिकारी डॉ.  दिलीप  टिपरसे यांच्या  मार्गदर्शनखाली अयोध्येतील  रामजन्मभूमी व बाबरी  मशिद  जागेच्या  निकाला संदर्भात येथील  ग्रामपंचायत आवारात    शांतता  समितीची बैठक  संपन्न झाली.   
         
 यावेळी सामाजिक, राजकीय,  सर्व  समाजातील  प्रतिनिधी,  ग्रामस्थ  यांना मार्गदर्शन  करताना तालुक्याचे उपविभागीय  पोलीस अधिकारी  डॉ.  दिलीप  टिपरसे म्हणाले की, अयोध्येतील रामजन्मभूमी, बाबरी  मशिद  प्रकरणी लवकरच   न्यायायलायकडून निकाल दिला जाणार आहे. हा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो त्यामुळे निकालानंतर अती उत्साही होवून जल्लोषात फटाके फोडणे, डिजे  लावणे,  मिरवणूक  काढणे, किंवा निकालाबाबत निषेध करणे या बाबी अयोग्य आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावर निकालासंबंधी कोणत्याही पोस्ट अथवा चर्चा करू नये, अथवा एखादी  पोस्ट त्या प्रकारची आढळून  आल्यास  तात्काळ  पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन त्यांनी  यावेळी  केले. तसेच 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून  ग्रामपंचायतच्या वतीने गावातील  प्रमुख  मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्यासाठी  पोलीसातील तज्ञांकडून सहकार्य  करण्याचे  आश्वासनही  त्यांनी  यावेळी दिले.
     
यावेळी तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  नितीन  मिरकर यांनीही मार्गदर्शन करताना  सांगितले की,  रामजन्मभूमी किंवा  बाबरी मशीद  जागेच्या  संदर्भात न्यायालयाकडून जो काही निकाल येईल. त्याबद्दल काही सांगता येत नाही परंतु निकालानंतर त्याबद्दल जल्लोष किंवा निषेध करणे चुकीचे आहे. तसेच सोशल मीडियावर देखील निकलाबद्दल चर्चा करू नये असे आवाहन केले. या बैठकीत माजी  जिल्हा परिषद  सदस्य  बाबुराव  ढगे यांनी  ग्रामस्थांच्या वतीने बोलताना सांगितले की,  या गावात सर्व  समाजातील  लोक  गुण्यागोविंदाने राहत असून गावात शांतता ठेवण्याचे आश्वासन दिले. 
     
यावेळी काटीतील सर्व समाजाचे प्रतिनिधी, सर्व पक्षातील  राजकीय  पदाधिकारी, पत्रकार व  सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, हिंदू, मुस्लीम समाजातील ग्रामस्थ  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 
Top