काटी, दि. 26 :
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात व महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेला असतांना तो रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. संबंध महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून, देवदूत बनून पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. आपणही समाजाचे काही देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मागील 25 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. युसुफ मुजावर यांचे चिरंजीव डॉ. अनिस मुजावर व डॉ. आसिफ मुजावर* या दोन बंधूंनी आपल्या स्वर्गीय आईच्या नावाने सुरू केलेल्या नाझ सहकारी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना विषयी तसूभरही माहिती नसणाऱ्या सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी विविध भागात फुटपाथवर फिरणाऱ्या ज्यांच्या डोक्यावर छत नाही, निराधार आहेत, मनोरुग्ण आहेत असे लोक संचारबंदीच्या काळात ते पोट कसे भरणार हा प्रश्र्न डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपत बुधवार दि. 25 रोजी सोलापूर शहरातील मनोरुग्ण व्यक्तींना अन्न आणि पाणी आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.
इतकेच नव्हे तर जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात व महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेला असतांना तो रोखण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. सर्वत्र संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्याचे पालन करीत घरी रहा, कोरोना विषयी काळजी घ्या, सुरक्षीत राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही डॉ. अनिल मुजावर यांनी केले आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी बेघर व्यक्ती, मनोरुग्ण व्यक्ती, पहायला मिळतात. बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय परिसर हेच त्यांचे छत बनलेले असते.येणाऱ्या-जाणाऱ्या कडून भीक मागून ते जगत असतात. पण, सध्या कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लागू झालेल्या संचारबंदीमुळे रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नाही. हॉटेल, अन्नपदार्थ विक्रीचे गाडे बंद झाल्याने बेघर, निराधार, मनोरुग्ण लोकांनी पोट कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना कोरोनाची भिती वाटत असेल परंतु अशा लोकांना अशीच संचारबंदी लागू असेल तर त्यांना पोट भरण्याची भिती सतावत असणार ही भावना मनात ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगून संचारबंदीच्या काळात आपला जीव मुठीत धरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र कष्ट घेत आहेत. त्या पोलीस बांधवांचीही नाझ सहकारी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे देशासमोर उभा टाकलेल्या संकटावर मात करण्यासाठी जातीभेदाच्या, धर्मांच्या भिंती पार करून सर्वांनी एकत्रित येऊन तसेच विविध सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन या संकटाचा सामना करण्याचे आवाहन केले. डॉ.अनिस व डॉ. आसिफ मुजावर यांना या सामाजिक कामात त्यांचे वडील डॉ. युसुफ मुजावर यांच्यासह संपूर्ण कुटुंब मदत करित आहेत.

