उस्मानाबाद :
उस्मानाबादचे सुपुत्र व सोलापूर येथील सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ञ व स्किनसिटी पदव्युत्तर प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ नितीन ढेपे यांची भारतीय त्वचारोगतज्ञ संघटना (IADVL) च्या माध्यम कक्षाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. आय ए डी व्हि एल ही भारतातील त्वचारोगतज्ञाची अधिकृत संघटना असून दहा हजाराहून अधिक त्वचारोगतज्ञ याचे सदस्य आहेत. या संघटनेचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांशी संवाद साधण्यासाठी व त्वचारोग विषयक जन जागृती करण्यासाठी डॉ नितीन ढेपे यांची निवड झाली आहे.
त्वचारोग आणि त्यावरील उपचार याबद्दल सामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत. पहिला गैरसमज म्हणजे त्वचारोग बरे होत नाहीत. पण वस्तुस्थिती अशी आहे की अनेक आधुनिक उपचार उपलब्ध झाल्याने अनेक त्वचाविकार पूर्ण बरे होऊ शकतात.
त्वचारोगावर उपचार करण्यासाठी अनेक भोंदू आणि अशिक्षित डॉक्टरांच्या जाहिराती पाहण्यात येतात. अशा अशास्त्रीय उपचारांमुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्वचा, नख, सौन्दर्य व केसांच्या समस्या असतील तर त्यावर मेडिकल कौन्सिल आणि त्वचारोगतज्ञ संगठना यांच्याकडून मान्यताप्राप्त डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत. तुमच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या त्वचारोगतज्ञाची सूची IADVL च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अनेक अप्रमाणित मलमे गोरे होण्यासाठी किंवा त्वचाविकारासाठी जाहिरातीच्या माध्यमातून किंवा मेडिकल दुकानातून डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय सर्रास विकली जातात. अशी मलमे महिनोंमहिने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्याने चेहरा खराब होणे, त्वचेवर स्ट्रेच मार्क पडून त्वचा फाटने, त्वचेवर पुरळ व पू होणे असे अनेक दुष्परिणाम होतात. अशाच मलमांच्या अनियंत्रित वापरामुळे भारतात सध्या औषधाला दाद न देणाऱ्या बुरशीजन्य त्वचारोगाची प्रचंड मोठी साथ आली आहे. यात पूर्वी साध्या औषधाने बरे होणारे गजकर्ण आता हजारो रुपये खर्च करूनही लवकर आणि पूर्ण बरे होत नाही. त्यामुळे कोणतेही मलम चेहरा किंवा त्वचेवर लावण्यापूर्वी त्वचारोगतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
या आणि अशा अनेक त्वचाविकार संबधित विषयावर जनजागरण करण्याचे काम हा माध्यम कक्ष करणार आहे. ६ एप्रिल हा दिवस "जागतिक त्वचा आरोग्य दिवस" world skin health day म्हणून साजरा केला जातो. भारतीय त्वचारोगतज्ञ संघटना माध्यम कक्षाच्या वतीने देशभर अनेक जगजगरणाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती डॉ नितीन ढेपे यांनी दिली.
