तुळजापूर, दि. ३

     गेल्या दोन वर्षांपासून गावात राष्ट्रिय स्वयंसेवक संघाअंतर्गत ग्रामविकासचे कार्य चालू असून या माध्यमातून गावात महिलांची ग्रामसमिती स्थापित करून समिती आधारे गावात दिवाळीत लागणारे शुद्ध नैसर्गिक उटणे निर्मिती, शुद्ध नैसर्गिक रंग निर्मिती असे छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत. 

सुगंधी उटण्याकरिता व रंग निर्मिती करिता प्रत्येकी 10 हजार रुपये गुंतवणूक करून उद्योग चालू केला होता.  कमी वेळेत ग्रामविकास कार्यकर्त्यांकडून प्रशिक्षण घेऊन रंग निर्मितीही केली आणि विक्री साठीही चांगली कसरत घ्यावी लागली. अगदी कमी कालावधीमध्ये गुंतवणुकीच्या 2 पट नफा महिलांना मिळाला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत उमेद गटाकरिता हिरकणी महोत्सव स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेत देवसिंगा (तूळ) ग्रामविकास महिला समितीतील उमेद गटाच्या महिलांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ त्या महिलांना मिळाले. या स्पर्धेत महिलांना तालुका स्तरीय 50 हजार रु. प्रथम बक्षीस व जिल्हा स्तरीय 2 लाख रु. प्रथम बक्षीस असे एकूण अडीच लाख बक्षीस देऊन जिल्हाधिकारी व त्या वेळेस मा. पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. यावर्षी याच अनुभवातून देवसिंगा (तूळ) व वागदरी या ग्रामविकास गावी शुद्ध नैसर्गिक रंगाची निर्मिती महिलांनी केली आहे.  


हा रंग शुद्ध नैसर्गिक व खाण्यायोग्य असल्याने या नैसर्गिक रंगाचा कोणताही परिणाम शरीराला किंवा त्वचेवर होणार नाही.  उटणेअसो वा रंग शुद्ध नैसर्गिक उत्पादन असल्याने शहरी भागातील लोकांकरीता कमतरता असलेले नैसर्गिक उत्पादन 100% विषमुक्त असून त्याचे महत्व सध्याच्या वातावरणातून जाणवत आहे. शहरी भागात या नैसर्गिक उत्पादनाची मागणी खूप मोठया प्रमाणात असून ग्रामविकास समितीतील महिला असे वेगवेगळे उत्पादन नियमित घेत आहेत. 
       
ग्रामजिल्हा संयोजक जयंतजी पाटील तसेच सर्व ग्रामविकास कार्यकर्त्यांसह कुटूंबातील सर्वांचे सहकार्य महिलांना मिळत असल्याने त्यांचा व्यवसायातील आत्मविश्वास उंचावला आहे.  वागदरी ता. नळदुर्ग या ग्रामविकास गावात लतिका पाटील, पार्वती बिराजदार, सुनीता पाटील, भाग्यश्री यादव, सुकुमार पाटील, वंदना सुरवसे, सविता पाटील, राजश्री सुरवसे, वनमाला पाटील व कल्पना पाटील तर देवसिंगा (तूळ) येथे भाग्यश्री भोसले, राणी मस्के, निर्मला भोसले, आशा दळवे, स्वाती जाधव, महादेवी भोसले, रजनी जाधव व ललिता भोसले या महिलांची रंग निर्मिती करिता समिती केलेली आहे. ग्रामविकास माध्यमातून नैसर्गिक रंग निर्मिती सारखेच यापुढेही गोआधाराईत वस्तू यात गोमय धुपबत्ती, मच्छर कॉईल तसेच रांगोळी असे विविध प्रकारचे लघुउद्योग सुरू करणार आहेत.
 
Top