खानापूर : बालाजी गायकवाड
कोरोनाच्या वाढत चाललेल्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रीय छावा संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष विश्वजीत चुंगे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते आदित्य गोरे यांनी तुळजापूर तालुक्यात 'मी महाराष्ट्रातील जबाबदार नागरिक , मी रक्तदाता' ही मोहिम राबवित असून ज्या रक्तदात्यांस रक्तपेढीत पोहचणे शक्य नाही त्यांच्यासाठी त्या त्या परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. या मोहिमेत रक्तदान करणार्या रक्तदात्याची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
विश्वजीत चुंगे व आदित्य गोरे यांनी राबविलेल्या 'मी महाराष्ट्रातील जबाबदार नागरिक, मी रक्तदाता' या मोहिमेची सुरुवात वडगाव (काटी) येथून सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांच्या वतीने रक्त संकलन करून करण्यात आले. या शिबिरास महिला व युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अश्या कडक उन्हाच्या वातावरणातही तब्बल 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी शिबिरात गर्दी होणार नाही, याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली होती.सोशल डिस्टंसिंगचे पालन करूनच रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कोरोनाच्या ह्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी व आजूबाजूच्या लोकानी स्वयंस्फुर्तीने या मोहिमेत सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रीय छावाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत चुंगे यांनी याप्रसंगी केले. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यास सॅनिटायजर व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जळकोटवाडीच्या प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्राच्या समुदाय आरोग्याधिकारी नाझीया शेख, आरोग्य सेवक विभुते, कोतवाल हणमंत क्षीरसागर, छावाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि छत्रपती शासन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
