काटी : उमाजी गायकवाड

'करोना'चा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गावे देखील सज्ज झाली आहेत. गावात करोनाची लागण होऊ नये म्हणून प्रत्त्येक गावचे पोलीस पाटील, ग्रा.प. कर्मचारी, शिक्षक गावाच्या प्रवेशद्वारात  पहारा देऊ लागले आहेत. तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायतने कोरोना सहाय्यता कक्षात नेमलेला कर्मचारी अनिल गोविंद बनसोडे हा कर्मचारी मात्र आपल्या गावात कोरोना येऊ नये, गाव हेच आपले कुटुंब आहे या भावनेतून सकाळी 7 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत अगदी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडीत आहे. 

पुणे, मुंबईत राहणाऱ्या व गावी येणाऱ्या नागरिकांना  तपासणीसाठी येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात घेऊन जाणे, त्यांना 14 दिवस गावाच्या बाहेर शेतात किंवा अन्य ठिकाणी राहण्यास सांगणे, अनेकांची त्यांने स्वत: गावाच्या बाहेर असलेल्या  येथील आश्रम शाळेत लाईट व्यवस्थेसह सोय केली तर परिसरातून येणाऱ्या नागरिकांची चौकशी करून व रजिस्टरमध्ये नोंद घेऊनच त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे.जगभरात चिंतेचा विषय बनलेल्या करोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासलेले काही तुटपुंज्या मानधनावर सुध्दा अनिल बनसोडे सारखे सर्व सामान्य कुटुंबातील लोकदेखील पुढे येऊन कोरोना विरोधी लढ्यात आपले मोलाचे योगदान देत आहेत.गावातील अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसतात.त्यांना तोंडावर मास्क, हातरुमाल बांधण्यास सांगणे,गावात येणाऱ्या रस्त्यावर काटेरी झुडपे टाकणे, लोकांना घराबाहेर न पडण्यासाठी तो अगदी आपलेपणाने सांगतो. त्याच्या या कामाबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे. 
    
    कोरोना विरोधी लढ्यासाठी भारतासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अशा स्थितीमुळं अनेक गावांतील ग्रामस्थांनी बाहेरच्या व्यक्तीला गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. गावपातळीवरील प्रमुख घटक असलेले तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सौ. शामलताई हंगरगेकर, गावचे कामगार पोलीस पाटील सौ. म्हेत्रे, ग्रा.प. सदस्य, शिक्षकवृंद गावातील लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत असून पुणे, मुंबईसारख्या महानगरातून आणि देश परदेशातून येणाऱ्या बाहेरच्या लोकांवर लक्ष ठेऊन आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नोंदी घेऊन त्याची माहिती ते प्रशासनाला देत कायदा व सुव्यवस्था पार पाडण्याचे काम करत आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना सहाय्यता कक्षामध्ये नेमणूक केलेल्या शिक्षकांना, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुरक्षेविषयक कोणतीही साधने देण्यात आली नाहीत.या शिक्षकांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व्यतिरिक्त हँडग्लोज, विमा संरक्षण, आदी आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
 
Top