सध्या देशात व जगात कोरोना महामारी संकट रौद्ररूप धारण केलेले असतान आज संपूर्ण विश्वावर कोरोनाचा संकट कोसळले आहे.आज अनेक मोठ -मोठे शहरे कोरोना मुळे ओस पडताना दिसतात.कोरोनाचे संकट हे कुठल्या कुटुंबावर, कुठल्या जिल्ह्यावर,कुठल्या राज्यावर किंवा कुठल्या देशावर नाही तर ते संपूर्ण जगावर कोसळले आहे . या संकटाची सुरुवातच मोठ्या-मोठ्या शहरात झाल्याने आज जगभर कित्येक शहरातील रुग्णालये रुग्णांच्या संख्येने भरले आहेत.
मानवी समुहाने या आजाराची लागण होत असल्याने स्थलांतरितांनी आपापली गावे गाठल्याने शहर अगदी ओस पडले आहेत तर कधी हे संकट जाईल याची वाट पाहून एक-एक दिवस मागे ढकलताना दिसतात. मात्र, गाव-खेड्यात आणि शहरातील काही भागांत परिस्थिती मात्र वेगळी पहायला मिळत आहे. लोक काळजी घेतायेत की नाही हे पाहण्यासाठी शहरासह गावोगाव पोलीस फिरतायेत. परंतु, पोलिसांचा हा फेरा झाल्यावर काही लोक गावच्या पारावर, जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात, मंदिर, मशिदीच्या कट्ट्यावर आम्हाला कुणाची आणि कशाची भीती अशा अविर्भावात वावरताना दिसतात.अशा बेजबाबदार लोकांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा तरी कुठे-कुठे आणि कशी-कशी लक्ष देणार असे आभाळ फाटत जाणाऱ्या परिस्थितीत? गाव-खेड्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शहरात पोलीस यंत्रणा असते तरी किती? अल्प मनुष्यबळावर अशा अस्मानी संकटातही त्यांना मोठ्या धैर्याने लढावे लागते. त्यात आपल्या या बेफिकिर वागण्याला ते कसे आळा घालतील ?असे बेसुमार वागूनही आपल्या लहानशा गावाला, हे कोरोना संकट वेढा घालणारच नाही का ? तर ते घालू शकते.
मात्र, हा आजार आमच्याकडे येणार नाही आणि आम्हाला काही होणार नाही हाच भाव आणि तोच विचार आहे. माणसांत आत्मविश्वास जरूर असावा. मात्र, असा फाजील आणि आडमुठेपणाचा आत्मविश्वास काही कामाचा नाही. असा आत्मविश्वास फायदेशीर तर नाहीच पण ठरलाचं तर तो विघातकच ठरतो.
आजही कित्येक गावागावात सकाळी-सकाळी गावातील पाण्याच्या सार्वजनिक हपशावर,नळावर पाण्यासाठी गर्दी करणारी संख्या मोठी आहे. येथे ही पाणी भरण्यासाठी आपला नंबर येईपर्यंत जमलेले रोजची तोंडावर तोंड असणारी ओळखीची मंडळी अगदी एकमेकांच्या जवळ येऊन, एक दुसऱ्याला तंबाखू, गुटखा, देऊन चर्चेचा फड रंगवतात. आणि याच चर्चेच्या फडात करोना कुठपर्यंत आला, कसा आला, कुणामुळे झाला, कसा झाला आणि किती मृत्यू झाले याची जोरदार चर्चा करताना दिसतात.आज कित्येक मोठी मोठी शहरे आणि हॉस्पिटल्स हतबल झाले आहेत . म्हणूनच गावकर्यांनो आपणच आपल्या गळ्याला करोनारुपी फास बसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्यामुळे कुणाचे जीवन उद्ध्वस्त करू नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले तरी जीवन का उद्ध्वस्थ करता.
ग्रामीण भागात कोरोनाचे संकट आले नाही पण बेजबाबदारी पणे वागलो तर गाव खेड्यात कोरोना येण्यास वेळ लागणार नाही.म्हणून वेळीच सावध होऊन स्वयंशिस्त लावण्याची गरज आहे.आपले घर,परिसर स्वच्छता ठेवणे,वारंवार हात साबणाने धुवणे,तोंडाला मास्क लावणे,प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सकस आहार घेणे,घरीच बसणे,स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे,कसले हि ञास होत असेल ताबडतोब सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करुन घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.तरच आपण व आपले गाव सुरक्षित राहिलं हे लक्षात घेतले पाहिजे.
रेखा सोनकवडे,
मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी, ता - अक्कलकोट .जिल्हा .सोलापूर