काटी : उमाजी गायकवाड

गत वर्षी अतिवृष्टी, यंदा  अवकाळी पाऊस आणि  कोरोनाची साथ यामुळे काटी, सावरगाव, जळकोटवाडी पईरिसरातील काटी कृषी मंडळा अंतर्गत येणाऱ्या   द्राक्षबागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. त्याचप्रमाणे शेतात पिकविलेला भाजीपाला कोरोना साथीमुळे तरकारी वहातूक करणारी वहानेही जागेवरच थांबल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी व व्यापारी यांना दारोदार जावून मातीमोल किंमतीने भाजीपाला विकावा लागतो आहे. त्याचप्रमाणे काटी कृषी मंडळा अंतर्गत 24 गावांचा समावेश असून 680 हेक्टरवर द्राक्षबागेची लागवड असून पैकी 200 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यात केली जातात. काटी, सावरगाव, जळकोटवाडी परिसरात बरेच शेतकरी द्राक्ष व भाजीपाल्याचे उत्पादन घेतात परंतु कोरोना साथीमुळे सर्व व्यवहार व वहातूक ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही द्राक्षबागायतदारांचा 50 टक्के लोकल माल गेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तसाच पडून आहे. दिवस जास्त होत असल्याने झाडावरच द्राक्षे  खराब होत आहे.

 मागील आठवड्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असताना शुक्रवारी रात्री अर्धा तास अवकाळी पाऊस पडल्याने द्राक्षांचे बरेचसे नुकसान झाले. व्यापारी आणि दलाल यांनी द्राक्षखरेदी आणि दरावर मर्यादा आणल्याने द्राक्षाचे करायचे काय असा प्रश्न द्राक्षबागायतदारांपुढे पडला आहे. शरद सिड्‌लेस ( काळी द्राक्षे) द्राक्षाचाही बेदाणा तयार करण्याची वेळ द्राक्षबागायतदारांवर आली आहे. यावर्षी लहरी निसर्गाने द्राक्षबागायतदारांची सुरुवातीपासून पाठ सोडली नाही. अगदी द्राक्ष छाटणीच्या अगोदर भयंकर पाऊस पडला.त्यानंतर छाटणीनंतर अवकाळी पावसाने गाठलं.त्यामध्ये अनेक द्राक्षबागा डाऊनी आणि ईतर रोगाचे बळी ठरल्या.तर काही बागांना कमी प्रमाणात पीक शिल्लक राहिले. काही द्राक्षबागायतदारांनी पाऊस उघडल्यावर पीक छाटणी घेतली. त्या बागांना जरा बर्यापैकी पीक आले. एकरी लाखो रुपये खर्च करून , लहरी निसर्गावर मात करुन द्राक्षाचे पीक घेतले.

 यावर्षी द्राक्षे कमी प्रमाणात असल्याने द्राक्षाला दरही समाधानकारक मिळेल. अशी अपेक्षा द्राक्षबागायतदारांना होती.द्राक्षाला दर मिळतही होता. द्राक्षाला चांगली मागणी देशाच्या बाजारपेठेत होती.दिल्ली, बैगलोर, हैदराबाद, बेळगाव, मद्रास, मुंबई, पुणे, कोलकाता व देशाच्या इतर ठिकाणाहून व्यापारी व दलाल द्राक्षे खरेदी करित असतात. द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. द्राक्षबागायतदार चांगल्या दराच्या अपेक्षेत असतानाच कोरोना साथ संपूर्ण देश आणि बाहेरील देशात आल्याने द्राक्षबागायतदारांच्या आशेवर पाणी फिरले आहे. सद्या बाजारपेठा बंद आहेत. याचाच गैरफायदा व्यापारी आणि दलालांनी घेण्यास सुरुवात केली आहे. अगदी दर्जात्मक द्राक्षेही कमी दराने खरेदी करण्याचा सपाटा व्यापारी व दलालांनी लावला आहे. द्राक्ष खपवायची कुठे असे म्हणून कमी प्रमाणात द्राक्षे खरेदी केली जात आहेत. व्यापारी व दलालांनी कोरोनाचे नावाखाली द्राक्षाचे करायचे काय,असा प्रश्न द्राक्षबागायतदारांना पडला आहे. 


द्राक्षे काढणीला आली आहेत. तर काही ठिकाणी मणी गळ सुरू झाली आहे. शरद सिड्‌लेस सारखी द्राक्ष सुकु लागली आहेत. त्यामुळे नाईलाजाने द्राक्षाचा बेदाणा तयार करण्यास द्राक्षबागायतदारांनी सुरुवात केली आहे. परंतु तुळजापूर तालुक्यात बेदाणा शेडची संख्या कमी असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सोलापूर, सांगली, कवठेमहांकाळ आदी ठिकाणी जावे लागत आहे. त्याचप्रमाणे बेदाण्यासाठी लागणारे केमिकल मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली आहे.  यामुळे  मोठा तोटा सहन करावा लागत आहे.शासनाने चालू वर्षी बेदाणा शेडनिर्मितीसाठी लक्षांक वाढवावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

वाहनेही जाग्यावर

द्राक्षाचा हंगाम सुरू झाल्यावर लेबर पुरवण्यासाठी माझ्या टेम्पोला  इतर वाहनांना द्राक्ष वाहतूकीचे काम मिळते.पण यावर्षी कोरोनाची साथ सर्वत्र सुरू आहे.त्यामुळे द्राक्षाची वाहतूकही कमी आहे. द्राक्ष बागायतदारांबरोबरच वाहनधारकांनाही कोरोणाचा फटका बसला आहे. असे सावरगाव येथील लेबर वहातूक टेम्पो चालक बाळासाहेब डोके यांनी सांगितले. 

नाईलाजाने बेदाणा करण्यास सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत द्राक्षाला कमी उठावाचे कारण पुढे करुन व्यापारी आणि दलालांनी लूट सुरू केली आहे.द्राक्ष खरेदी केली जात नाही. त्यामुळे वेलीवरच द्राक्षे सुकुन निघाली. कोरोनापुर्वी अनेक व्यापारी येऊन चांगल्या भावाने द्राक्षाची मागणी करीत होते. परंतु आता कोरोनाचे कारण पुढे करुन द्राक्षे काढण्यास नकार देत आहेत. नाईलाजाने मी आता शरद सिड्‌लेस द्राक्षाचा बेदाणा तयार करण्यास सुरुवात केली आहे. 

 - नाबाजी गोरख ढगे 
 द्राक्षबागायतदार, काटी ता. तुळजापूर




नाईलाजाने बेदाण्याकडे वळावे लागत आहे

एक्सपोर्ट द्राक्षांना कोरोना साथीमुळे मागणी नसल्याने व व्यापारी येत नसल्याने त्याच प्रमाणे बेदाणा शेडची संख्या कमी असल्यामुळे शासनाने चालू वर्षी बेदाणा शेडनिर्मितीसाठी लक्षांक वाढवावा अशी अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा असून नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांना बेदाण्याकडे वळावे लागत आहे.

 - आनंद पाटील
 प्रभारी मंडळ कृषी अधिकारी काटी ता. तुळजापूर
 
Top