मुरुम : शेतकऱ्याच्या नशीबी अठरा विश्व दारिद्र कधी दुष्काळ,निसर्गाची अवकृपा,गारपीट तर आता कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत आला आहे.
भुसनी ता. उमरगा येथील नेहरु मलशेट्टी पाटील यांनी आपल्या दोन एकर शेतीत यंदा कलिंगडाची लागवड मोठया कष्टाने व जिदीने केली. बँकेचे कर्ज व उसनवारी करुन शेतीत पैसे घातले. या शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला बगल देवून सुधारीत शेती करुन चार पैसे कसे मिळतील व हे नगदी पीक ताबडतोब हातीशी कसे येईल. या आशेने रात्रीचा दिवस करुन मेहनत व देखभाल घेऊन कलिंगडाची लागवड केली.ग्रामीण भागात तर भारनियमन असतानाही वेळेचे नियोजन करुन पीकाला पाणी कमी पडू दिले नाही.मशागतीपासून ते माघड्या औषधे, किटकनाशच्या फवारण्या दर दोन दिवसा केल्या.या कलिंगडाचे वजन ८ ते १० किलो भरले.मालही चांगला जोमदार,दर्जेदार व वजनदार झाल्याने पैसे घातल्यासारखे उत्पन्नही होईल या आशेपोटी काभाड-कष्ट केले आणि फायदा होईल.परंतु कोरोना विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाल्यामुळे कोणताही व्यापारी खरेदीकरिता येत नाही आणि संपूर्ण बाजारपेठाही बंद असल्याने हा माल विकायचा तरी कुठे?त्यामुळे हा माल पडूनच राहणार. शेतकऱ्याने चार महिन्यापासून घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरले.हातातोंडाशी आलेला घास व उत्पन्न डोळ्यासमोर त्याची स्वतःच्या हाताने कलिंगडाचे बारीक टुकडे करुन मुक्या जनावरांना चारताना शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आले.लाखो रुपयाचा खर्च करुन पदरात काहीच पडेना.हा माल तीन लाखापेक्षाही अधिक झाला असता पण जेवढा खर्च केला तेवढा खर्च देखील निघाला नाही.उलट शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटले आणि तोटा सहन करावा लागला.शारीरिक, मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागला.शेवटी कलिंगड जागेवरच नासून जाण्यापेक्षा जनावरांना तरी खाऊ घालावे आणि परिसरातील गरीबांना कलिंगड खायला दयावे या भावनेने दुःखी होऊन या शेतकऱ्यांने शेतातील कलिंगडे देण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे.
