काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी या ठिकाणी माळुंब्रा सबस्टेशन अंतर्गत काटी विद्युत उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु येथील गावासाठी  असणारा ट्रान्सफॉर्मर सताड उघडा व त्यातील वायरिंग व किटकॅटची दयनीय अवस्था झाल्याने वारंवार डिपीतील फ्युज जाणे, बिघाड होणे ही बाब नित्याचीच बनली आहे. येथील नागरिक मागील वर्षभरापासून ट्रांन्सफॉरमर दुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहेत. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तात्पुरती मलमपट्टी करून मुख्य दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून तीव्र  संताप व्यक्त केला जात आहे.


 सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गावातील सर्व नागरिक घरांमध्ये बसून आहेत.अनेक आस्थापनांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना सुरू केली आहे. घरामध्ये बऱ्याच दिवसांनी कोरोनामुळे सर्वजण एकत्र आले आहेत.काही दिवसांपासून वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. परंतु येथील डिपीतील दुरावस्थेमुळे सतत बिघाड होत असल्याने बाहेर संचारबंदी आणि घरात उकाड्याने नागरिकांसह अबालवृद्ध हैराण झाले आहेत. येथील ट्रांसफार्मर व्यवस्थित काम करत नसल्याने पर्यायाने अनेकदा ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. आणि याकडे येथील लाईनमनचेही दुर्लक्ष होत असल्याचे  ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

डीपी सताड उघडी असल्याने येथील ग्रामस्थांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नादुरुस्त असलेला ट्रांसफार्मर लवकरात लवकर दुरुस्त करून आणखी एक नवीन स्वतंत्र ट्रांन्सफॉर्मर बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 
Top