खानापूर : बालाजी गायकवाड
नैसर्गिक संकटाला सतत तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास यंदा कोरोनाच्या संकटाने हिरावून घेतला आहे.देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी वसंतराव वडगावे यांनी आपल्या शेतामध्ये साडेचार एकरावर टोमॅटो ची लागवड केली होती.परंतु लॉकडाऊनमुळे टोमॅटोच्या विक्रीस बाजारपेठ उपलब्ध झाली नसल्याने टोमॅटो रानावरच सडून गेले.बाजारपेठा बंद असल्याने टोमॅटो ची विक्रीच झाली नाही.विशेषता या टोमॅटोपासून उत्पन्न तर सोडा पण लागवाडीसह मशागतीसाठी केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
वडगावे यांनी साडेचार एकरावर इंडम प्रजातीच्या टोमॅटोची लागवड केली होती.यासाठी त्यांनी जवळपास अंदाजे चार लाखापर्यंत खर्च करून बागेची चांगल्या प्रकारे जोपासना केली होती.पण या कोरोनाच्या संकटामुळे टोमॅटो खरेदी साठी ग्राहक नसल्याने टोमॅटो खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. बागेची चांगल्या प्रकारे जोपासना केल्याने बागही चांगली बहरली होती.टोमॅटोची झाडे लकडून गेली होती.या टोमॅटोपासून त्यांना अंदाजे आठ ते नऊ लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ऐन टोमॅटो काढणीच्या वेळेस कोरोनाचे संकट आले. आणि कोरोनाने त्यांच्या तोंडाचा घास पळवून नेला.
टोमॅटो खरेदीसाठी व्यापारी नसल्याने व त्याच्या तोडणीचा मजुरीचा खर्चही निघणार नसल्याने त्यांनी गावातील नागरिकांसाठी साडेचार एकरावर जोपासलेली बाग खानापूर व परिसरातील नागरिकांसाठी खुली करून दिली.
तसेच त्यांनी आपल्या शेतात तीन एकरावर कलिंगड तर,दोन एकरावर खरबूजाची लागवड केली होती.याचीही परस्थिती टोमॅटो सारखी झाली आहे.त्यालाही बाजारपेठ उपलब्ध नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी कवडीमोल दरात कलिंगडाची खरेदी केली. यामुळे त्यांना कलिंगड,खरबूज व टोमॅटो यातून उत्पन्न तर सोडा पण लागवडीसाठी, मशागतीसाठी केलेला खर्चही निघाला नाही.या तिन्ही बागेतुन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकरी अगोदरच मोठ्या संकटात होता आणि त्यात कोरोनामुळे भर पडली आहे.यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू ढासळली आहे.तरी शासनाने निदान खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे व खताची वाटप करावे.
- वसंत वडगावे
