जळकोट : मेघराज किलजे
सध्या कोरूना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. या काळात अनेकजण विविध छंद जोपासत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्य जनता वेळेचा सदुपयोग करत असल्याचे दिसून येत आहे. वेळेचा उपयोग करण्याची युक्ती अनेक जण शोधत आहेत. बंदिस्त जीवनाचा उपयोग कसा करून घेता येईल याची युक्ती शोधत आहेत. जळकोट येथील कवी गावात आल्यानंतर स्वतःहून विलगीकरणाचा मार्ग शोधला, यात या कवीने कवी मनाबरोबर निसर्ग छंद जोपासला आहे.
जळकोट येथील कवी सुरज अंगुले हे उदरनिर्वाहासाठी सोलापूर येथे वास्तव्यास आहेत. कोरोना विषाणूमुळे संचारबंदी लागू झाल्यानंतर सोलापूर येथून दि.२४ एप्रिल २०रोजी जळकोट गावात आल्यानंतर स्वतःहून गावच्या हितासाठी ग्रामपंचायतीच्या कोरोना सहायता कक्षाशी संपर्क साधून मला विलगीकरण कक्षात राहायचे आहे. असे सांगितल्यानंतर जळकोट च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी झाली. त्यानंतर सूरज अंगुले जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर शाळेच्या विलगीकरण कक्षात राहत असताना या काळात कवी सुरज अंगुले यांनी निसर्ग छंद जोपासात या वेळेचा सदुपयोग केला आहे.
या काळात शाळेच्या परिसरातील विविध झाडांना पाणी देणे, परिसर स्वच्छ ठेवणे, शाळेच्या भिंती बोलक्या करणे, वाचन, कविता लिहिणे. असे छंद जोपासले आहेत. नियमितपणे वैशाखवणव्यात झाडांना पाणी दिल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत. अंगुले यांनी पाणी दिल्याने झाडांना पालवी फुटली आहे. कविता करण्याबरोबर निसर्ग छंद त्यांना जडला आहे. त्याचबरोबर कोरोना युद्ध या शीर्षकाखाली सुंदर कविता लिहिली आहे. आपला अमूल्य वेळ वाया न घालवता या काळात निसर्ग व स्वतःसाठी खर्च केलेला वेळ पुढे प्रेरणादायी ठरणार आहे.
स्वतःहून विलगीकरण करून घेतल्याने त्यांची देशाप्रती असलेली भक्ती आदर्शवत आहे. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी दि.७मे रोजी संपत आहे. अंगुले यांनी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या काळात ग्रा.प. सदस्य आशीष सोनटक्के, संजय माने, विशाल साखरे, कुसुम शिंदे, अंगणवाडी सेविका संगीता लोखंडे, दरेकर यांनी सहकार्य केल्याचे सुरज अंगुले यांनी सांगितले.
