तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सौ.दिपा मुधोळ मुंढे यांना तुळजापूरातील स्थानिक पुजारी,व्यापारी व गरजूवंतांना किराणा किट्सचे वाटप करावे अशी मागणी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष  अमरराजे कदम यांनी निवेदनाव्दारे केली आहे.  
     
  सध्या जगभर कोरोना विषाणूचा प्रभाव वाढतच चाललेला आहे.देशाच्या पंतप्रधानांनी संपुर्ण भारतात लाॅकडाऊन सुरू केलेला आहे.गेल्या दोन महिन्यापासून संपुर्ण तुळजापूर शहरात लाॅकडाऊन असल्याने व मंदीर देविभक्तांसाठी अनिश्चित काळाकरीता बंद झालेले असल्याने, अनेक पुजारी,व्यापारी व सर्वसामान्य शहरवासीयांना यामुळे आर्थीक अडचणीला सामोरे जावे लागत आहेत.तुळजापूर शहरातील पुजारी,व्यापारी व सर्वसामान्यांचा संपुर्ण उदरनिर्वाह हा श्री.तुळजा भवानी मातेच्या मंदीरावरतीच अावलंबून असतो.या सर्वांची मंदीर संस्थानला नेहमीच मदत होत असते. परंतू आता या कोरोनामुळे पुजारी व्यवसाय व सर्व व्यापारी धंदे बंद पडल्याने मंदीर संस्थानने ५००० किराणा साहित्याचे किट्स तयार करून तहसिलदार मार्फत जिल्ह्यात वाटप केल्याचे कळते परंतू यातील काही किट्स हे भोपे पुजारी,पाळकर पुजारी,व उपाध्ये पुजारी असे तिन्ही पुजारी मंडळासह इतर ही गरजूवंतांना वाटप करावेत.असे निवेदनात नमूद केलेले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराच्यावतीने दि.२३ एप्रील रोजी याबाबतचे निवेदन ही देण्यात आलेले होते.परंतू आजपर्यंत मंदीर संस्थानने योग्य ती निवेदनाची दखल घेतली नाही याची खंत व्यक्त करून तात्काळ जिल्हाधिकारी  यांनी तुळजापूरातील पुजारी,व्यापारी व गरजूवंतांना किराणा साहित्याचे किट्सचे वाटप करावे अशी मागणी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम यांनी केली आहे.याबाबत मंदीरच्या व्यवस्थापक सौ.योगिता कोल्हे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लवकरच जिल्हाधिकारी मॅडम व एसडीओ साहेबांशी चर्चाकरून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मत व्यक्त केले.



 
Top